शहरावर फाटले आभाळ, ढगफुटीपेक्षा अधिक वेगाने पाऊस, शेकडो घरे, दुकानांत पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:04 AM2021-09-08T04:04:01+5:302021-09-08T04:04:01+5:30
औरंगाबाद : मंगळवारी सायंकाळी शहरावर अक्षरशः आभाळ फाटले आणि ढगफुटीपेक्षाही अधिक वेगाने कोसळलेल्या पावसाने एकच हाहाकार माजविला. ताशी ६० ...
औरंगाबाद : मंगळवारी सायंकाळी शहरावर अक्षरशः आभाळ फाटले आणि ढगफुटीपेक्षाही अधिक वेगाने कोसळलेल्या पावसाने एकच हाहाकार माजविला. ताशी ६० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. शहरातील विविध भागांतील शेकडो घरे, दुकानांत पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. घरात साचलेले पाणी काढताना रात्रभर नागरिकांची दमछाक झाली. एमजीएम वेधशाळेत सायंकाळी ७.१० ते रात्री ८.१० वाजेदरम्यान तर चिकलठाणा वेधशाळेत ११६.० मि.मी. पावसाची नोंद झाली.
शहरात मंगळवारी पहाटेच पावसाने हजेरी लावली. दुपारी १२ वाजेपर्यंत कधी जोरदार, तर कधी मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पावसाने पुनरागमन झाले. अवघ्या काही क्षणात पावसाचा जोर वाढला. एखादा उंच धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याप्रमाणे पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाच्या या रौद्रावतारामुळे अगदी हातावरच्या अंतरावरील दृश्य दिसेना झाले. काही मिनिटांच जालना रोड, सिडको, हडको, पैठण गेट, औरंगपुरा, जयभवानीनगरसह सिडको, हडकोसह बहुतांश रस्त्यांवरून ओढे, नदीप्रमाणे पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती.
पावसाच्या धारांचा जोर वाढत होताच, त्याच वेळी विजेचा कडकडाट सुरू झाला. लख्ख प्रकाशाने कुठे तरी वीज कोसळली, असे शब्द नागरिकांच्या तोंडातून आपसूकच बाहेर पडले.