छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरणाचा हवाई अन् समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला फटका
By संतोष हिरेमठ | Published: November 28, 2023 01:14 PM2023-11-28T13:14:12+5:302023-11-28T13:19:37+5:30
इंडिगोचे मुंबई विमान रद्द, तर एअर इंडियाचे विमान घिरट्या मारून परतले
छत्रपती संभाजीनगर : ढगाळ आणि धुक्याच्या वातावरणामुळे मंगळवारी सकाळचे इंडिगोचे मुंबई- छत्रपती संभाजीनगर - मुंबई विमान रद्द झाले. तर एअर इंडियाच्या विमानाला छत्रपती संभाजीनगरच्या आकाशात घरट्या मारून मुंबईला परत जावे लागले.
शहरात आज, मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळी धोक्याच्या वातावरणाचा विमानसेवेला फटका बसला. इंडिगोचे मुंबई विमान रद्द करण्याची वेळ ओढवली. तर एअर इंडियाच्या विमानाला चिकलठाणा विमानतळावर उतरता आले नाही. त्यामुळे विमान पुन्हा मुंबईला गेले. एअर इंडियाचे हे विमान तासाभरानंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगरला आले. दिल्ली, हैदराबादच्या विमानालाही खराब हवामानाचा फटका बसला. हे दोन्ही विमानेही उशिराने दाखल झाली.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर देखील धुक्यामुळे सकाळी १० वाजेपर्यंत कमी दृश्यमान होते. यामुळे काहीवेळ महामार्गावर कमी प्रमाणात वाहतुक होती, अशी माहिती आहे. हवाई आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना शहरातील खराब वातावरणाचा फटका बसला आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस बरसत असून ढगाळ वातावरण आहे. असेच वातावरण बुधवारी देखील असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.