सोयगावात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:10 AM2017-07-18T01:10:24+5:302017-07-18T01:14:04+5:30
सोयगाव/बनोटी : तालुक्यातील हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी सोमवारी सोयगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव/बनोटी : तालुक्यातील हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या विद्यार्थिनीच्या खूनप्रकरणी सोमवारी सोयगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. गोरसेना शाखेच्या वतीने मूकमोर्चा काढून निषेध करण्यात आला व सीमाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
सीमा रामदास राठोड (१६) ही शुक्रवारी (दि. १४) पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाबाहेरील विहिरीवर गेली असता, तिचे अज्ञात आरोपींनी अपहरण करून खून केला व मृतदेह घाटनांद्रा घाटात फेकून दिला होता. ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी सोमवारी सोयगाव बंदची हाक दिल्याने या बंदमध्ये सर्वांनीच सहभाग घेतल्याने पोलिसांनी मोठा धसका घेतला. शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शिवाजी चौकातून शिस्तीत निघालेला मूकमोर्चा सोयगाव पोलीस ठाण्यावर धडकला. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप वैराळे, नीरज राजगुरू यांना निवेदन देण्यात येऊन माघारी फिरलेल्या मोर्चेकऱ्यांनी शिवाजी चौकात प्रशासनाचा निषेध करुन मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळविला. सोयगावच्या तहसीलदार छाया पवार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य चौकात दंगाकाबू पथकाचे जवान, दरोडा प्रतिबंधक पथक, सिल्लोड, अजिंठा, फुलंब्री येथील पोलीस पथके तैनात करण्यात आली होती.
मूकमोर्चातील प्रमुख मागण्या
संबंधित घटनेचा तपास गुप्तचर विभागाकडे सोपवावा, पीडित अल्पवयीन मुलीवर अपहरणासोबतच सामूहिक अत्याचार झाला असून पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनात नमूद केला आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असे गोरसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोमवारी हनुमंतखेडा गावात जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पोलीस पथके तपासासाठी गावाच्या आजूबाजूला फिरत होती. पोलिसांच्या संशयाची सुई स्थानिक असल्याची शक्यता दिसून आल्याने हनुमंतखेड्याला छावणीचे स्वरूप आले होते. सीमारेषेवर असलेल्या जळगाव पोलिसांनाही घटनेवर लक्ष देण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने तेही या भागाच्या संपर्कात आहेत.