विनाअट संपुर्ण कर्जमाफीसाठी खरात आडगावात चुलबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 04:41 PM2017-07-24T16:41:09+5:302017-07-24T16:41:09+5:30
शेतक-यांना विना अट संपुर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी खरात आडगांव येथील ग्रामस्थांनी आज चुलबंद आंदोलन केले.
ऑनलाईन लोकमत
बीड/माजलगाव : शासनाने दिलेली कर्ज माफी ही फसवी असुन रोज नवनवी अध्यादेश काढुन शासनाने शेतक-यांच्या कर्जमाफीची थटटा चालविलेली आहे. शेतक-यांना विना अट संपुर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी खरात आडगांव येथील ग्रामस्थांनी आज चुलबंद आंदोलन केले. यानुसार गावात एकही चुल न पेटवता संपुर्ण गाव उपवास करत आहे.
खरात आडगांव येथील ग्रामस्थांनी 23 जुन रोजी ग्रामसभा बोलावुन या ग्रामसभेत संपुर्ण कर्ज माफी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागु कराव्यात या मागण्यांसाठी चुलबंद आंदोलन करण्याचा ठराव घेतला होता. शासनाने कर्ज माफी केली खरी परंतु कर्ज माफीसाठी टाकलेल्या जाचक अटींमुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे. यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत .
शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागु करण्यात याव्यात, शेतक-यांना पेन्शन लागु करावी अशा मागण्या करीत आज गावक-यांनी संपुर्ण चुलबंद आंदोलन केले. सुमारे 3 हजार लोकसंख्या असलेल्या गावात सकाळपासुन एकही चुल पेटली नाही. येथील सेवा सहकारी सोसायटीच्या गोदामाच्या प्रांगणात सर्व गांवकरी, शेतकरी यांनी एकवटुन शासनाच्या फसव्या कर्जमाफी विरोधी घोषणा देत उपवास केला.
30 जुलै पर्यंत शासनाने सरसगट कर्ज माफी न केल्यास गांवक-यांच्या वतीने आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे येथील सरपंच निवृत्ती भिमराव रासवे यांनी सांगीतले. नायब तहसीलदार सिरसेवाड एस.डी., मंडळ अधिकारी एस.आर. झोंबाडे, तलाठी श्रीमती एस.डी. ठोसरे, ग्रामसेवक डी.जी. करे आदींनी यावेळी ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. आंदोलनात गंगाभिषण थावरे, पंचायत समिती सदस्य मिलींद लगाडे, बप्पा शिंदे, भगीरथ शेजुळ आदींसह शेकडो ग्रामस्थ समिल झाले होते.
दरम्यान, चुलबंद आंदोलन चालु असतांना येथील तरुण शेतकरी रामेश्वर भागवत शेजुळ वय 27 वर्षे याने अंगावर राॅकेल ओतुन पेटवुन घेण्याचा प्रयत्न केला परंतु घरच्यांनी तात्काळ त्याच्या हातातील काडयाची पेटी ओढुन घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.