चंद्रशेखर राव यांची राजू शेट्टींना साद; 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा' थेट ऑफरवर आज होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:13 PM2023-02-13T12:13:44+5:302023-02-13T12:14:22+5:30

आज पैठण येथील राज्य कार्यकारणीच्या बैठकीत तेलंगणाचे मुख्रयमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या ऑफरवर चर्चा होणार आहे

CM Chandrashekhar rao offers Raju Shetti to join BRS and be a Maharashtra CM | चंद्रशेखर राव यांची राजू शेट्टींना साद; 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा' थेट ऑफरवर आज होणार निर्णय

चंद्रशेखर राव यांची राजू शेट्टींना साद; 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा' थेट ऑफरवर आज होणार निर्णय

googlenewsNext

औरंगाबाद: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोबत काम करण्यासाठी साद घातली आहे. दरम्यान, चंद्रशेखर राव यांच्या ऑफरवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत आज चर्चा होणार आहे. तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीच्या राज्याच्या राजकारणात प्रवेशाने नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांच्या ऑफरवर स्वाभिमानी शेतकरी संघटना काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची देशव्यापी राजकारणाचा चेहरा बनण्याची महत्वाकांक्षा आहे. यामुळेच त्यांनी पक्षविस्ताराची सुरुवात महाराष्ट्रातून केली आहे. राव यांची नुकतीच नांदेडमध्ये सभा झाली. महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी त्यांनी आजीमाजी आमदार, खासदार आणि विविध पक्ष संघटनांसोबत चर्चा केली आहे. शेतकरी प्रश्नांवर बीआरएसचे राजकारण केद्रित आहे. महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर शेतकरी प्रश्नांची जाण असणारा नेता राव यांना हवा आहे. यातूनच त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माही खासदार राजू शेट्टी यांना साद घातली आहे. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, अशी थेट ऑफर शेट्टी यांना देण्यात आल्याची माहिती आहे. 

गेल्या महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि राजू शेट्टी यांच्यात हैदराबादमध्ये एक बैठक झाली. शेतकरी प्रश्नांसोबत दोघांत राजकीय चर्चा देखील झाली. यावेळी 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा', अशी थेट ऑफर मुख्यमंत्री राव यांनी शेट्टी यांना दिली. मात्र, शेट्टींनी ही ऑफर नाकारली. मात्र, आज पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. ज्यात आगामी पक्षाची वाटचाल, ध्येयधोरणांवर चर्चा होईल. यावेळी राव यांच्या ऑफरवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. 

थेट बीआरएस झेंडा नाही पण युतीची शक्यता?
बीआरएसकडून आम्हाला ऑफर आली असून, आम्ही ती नाकारली आहे. आम्हाला चळवळीतच राहून काम करायचे असल्याचे चंद्रशेखर राव यांना सांगितल्याचे शेट्टी यांनी ऑफरवर बोलताना सांगितले. इतर पक्षात जाणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बीआरएसमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी प्रश्नांवर बीआरएसने तेलंगणात जम बसवला आहे. तसेच देशात शेतकऱ्यांचे कैवारी अशी प्रतिमा राव करू इच्छित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर बोलणाऱ्या स्वाभिमानी आणि बीआरएस यांच्यात पुढे ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे. 

Web Title: CM Chandrashekhar rao offers Raju Shetti to join BRS and be a Maharashtra CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.