मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री करणार ध्वजारोहण, इतर जिल्ह्यात कोणते मंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:29 PM2023-09-13T12:29:48+5:302023-09-13T12:32:22+5:30
मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवास सुरुवात; १७ सप्टेंबरच्या ध्वजारोहणासाठी मंत्री ठरले
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त विभागात १७ सप्टेंबर रोजी ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर मुख्यालय येथील ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल.
तर जालना येथे पणनमंत्री अब्दुल सत्तार, नांदेड येथे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बीड जिल्ह्यात कृषिमंत्री धनंजय मुंडे, लातूर येथे क्रीडामंत्री संजय बनसोडे, परभणीत गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, रोहयोमंत्री संदीपान भुमरे हे हिंगोली जिल्ह्यात, तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे धाराशिवमध्ये ध्वजारोहण करतील.
मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवास आजपासून सुरुवात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ व १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे उद्घाटन होईल. यानंतर डॉ. रश्मी बोरीकर यांचे ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्त्रियांचे योगदान’ यावर बीजभाषण होईल. दुसऱ्या सत्रात विद्यापीठ विद्या परिषद सदस्य प्रा. डाॅ. व्यंकटेश लांब, विवेक भोसले यांचे व्याख्यान होईल. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. डॉ. बा.आं. म. विद्यापीठातील एचआरडीसी सभागृहात प्रा. डाॅ. उमेश बगाडे, अनिल पहाडे यांचे व्याख्यान होईल. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. गीतांजली बोराडे, डाॅ. मंगला बोरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप होईल.
राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ १५ सप्टेंबर रोजी तापडिया नाट्यमंदिरमध्ये दुपारी चार वाजता होईल. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री संदीपान भुमरे, पणनमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यासह सर्व आमदार, सनदी अधिकाऱ्यांची उपस्थिती असेल.