कोचिंग क्लासची तपासणी सुरू, मंगल कार्यालयांवर वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:02 AM2021-02-18T04:02:41+5:302021-02-18T04:02:41+5:30
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व ...
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. मंगल कार्यालयांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी नागरी मित्र पथकाला आदेश दिले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे घर मायक्रो पद्धतीने सील करण्यात येईल. घरावर स्टीकर सुद्धा लावण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी माहिती दिली की, शहरातील कोचिंग क्लासेस सुरू झाले आहेत. कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यासाठी ५ स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. या टीममध्ये एक डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफचा एक कर्मचारी, शिक्षक, नागरी मित्र पथकाचा एक सदस्य आहे. ज्या कोचिंग क्लासेसमध्ये १० विद्यार्थी आहेत, तेथे कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. ५० विद्यार्थी असतील तर पाच हजार रुपये, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असेल तर दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन होत असेल तर कोचिंग क्लासेस सील करण्यात येईल. तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाले तर थेट एफआयआर करण्यात येईल.
मंगल कार्यालयामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता नागरी मित्र पथकातर्फे सध्या नजर ठेवण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर संबंधित मंगल कार्यालय चालकावर दंड आकारण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरांवर स्टीकर लावण्याची योजना आहे, असे पाडळकर यांनी नमूद केले.
शहरात रुग्ण संख्या वाढली तर
महापालिकेकडे मेल्ट्राॅन हॉस्पिटल येथे ३००, पदमपुरा येथे ५० रुग्ण ठेवण्याची क्षमता आहे. एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि किलेअर्क या दोन ठिकाणी पुन्हा रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सध्या मेल्ट्रॅान हॉस्पिटलमध्ये १५२, पदमपुरा येथे ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना तपासणीसाठी दोन मोबाईल टीम तयार करण्यात येत आहेत.