कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्यांना चोपले
By Admin | Published: June 30, 2017 12:08 AM2017-06-30T00:08:14+5:302017-06-30T00:17:37+5:30
औरंगाबाद : मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरसह दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आकाशवाणी चौकातील आकाश इन्स्टिट्यूट आॅफ नीट, आयआयटी- जेईई फाऊंडेशन्सच्या शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी येताच शिवसेनेच्या पन्नासहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मॅनेजरसह दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी (दि.२९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
शिवहारी वाघ आणि रोहीत सूळ अशी छेडछाड करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दिल्ली येथील आक ाश इन्स्टिट्यूटची आकाशवाणी चौकात बँ्रच आहे. इन्स्टिट्यूटमध्ये नीट, जेईई फाऊं डेशनसाठी शिकवण्या चालतात. शिवहारी वाघ हा तेथे बॅ्रच मॅनेजर, तर रोहीत सूळ हा कार्यालयीन कर्मचारी आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलींना पाहून आरोपी सतत अश्लील कमेंट करीत असत. मुलींचे कपडे, शरीरयष्टीवर ते मुलींना बोलावून बोलत असत. सुरुवातीला मुलींनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडत असल्याने सर्व मुलींनी याविषयी आपापल्या पालकांकडे तक्रार केली. पालकांनी शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली. थोरात यांच्यासह शिवसेनेचे पन्नासहून अधिक कार्यकर्ते गुरुवारी कोचिंग क्लासवर पोहोचले. त्यांनी सुरुवातील मॅनेजर वाघ यास जाब विचारला आणि मुलींना छेडणाऱ्या कर्मचाऱ्यास बोलावून घेण्यास सांगितले. तो कर्मचारी तेथे आल्यानंतर मॅनेजरसमोर पीडित मुलींनी कालपर्यंत घडलेला प्रकार कथन केला. मॅनेजर, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांनाही बेदम चोप दिला. पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळुंके आणि कर्मचाऱ्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये धाव घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि ठाण्यात नेले. पीडित मुलींना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे पाच ते सहा मुलींनी महिला पोलीस अधिकारी आणि महिला तक्रार निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात मुलींच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी दिली.
शिवसेनेचे पदाधिकारी पीडित मुलींना घेऊन जिन्सी ठाण्यात गेले. पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक वसूरकर यांची भेट घेतली. कोचिंग क्लासमध्ये राडा केल्याचे आणि दोन जणांना चोप दिल्याचे समजताच वसूरकर यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावण्यास सुरवात केली. यावेळी थोरात यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास पोलीस आयुक्तांकडे तक्रार करू, असा दम दिला. यामुळे उभयतांमधील खडाजंगी वाढली. हे पाहून शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी तुमच्या-आमच्या मुलींची छेडछाड होत असल्यास आम्ही शांत कसे बसणार, असा सवाल करीत कोणत्याही पालकाचा राग अनावर होतोच, असे स्पष्ट केले.