विद्यापीठातील स्पॉट ॲडमिशनलाही विद्यार्थ्यांचा थंड प्रतिसाद

By राम शिनगारे | Published: August 3, 2024 12:13 PM2024-08-03T12:13:20+5:302024-08-03T12:14:33+5:30

किचकट अर्ज प्रक्रियेसह असहकार्याचा मोठा परिणाम प्रवेश संख्येवर झाल्याची माहिती

Cold response of students to the spot admission in the BAMU university | विद्यापीठातील स्पॉट ॲडमिशनलाही विद्यार्थ्यांचा थंड प्रतिसाद

विद्यापीठातील स्पॉट ॲडमिशनलाही विद्यार्थ्यांचा थंड प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना स्पॉट ॲडमिशनच्या दिवशीही काही अपवादात्मक विभाग सोडता उर्वरित विभागांमध्ये थंड प्रतिसाद मिळाला आहे. संगणकशास्त्र, रसायनशास्त्रासह इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर विभागांमध्ये पूर्ण भरल्या गेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने मात्र नेहमीप्रमाणे आकडेवारी देण्यास टाळाटाळ केली.

विद्यापीठात अडीच महिन्यांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सीईटीनंतर जाहीर केलेल्या दोन फेऱ्यांमध्ये अवघे ४३९ प्रवेश झाले होते. अनेक नामांकित विभागाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. त्या पार्श्वभूमीवर स्पॉट प्रवेशाला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, विद्यापीठातील काही विभागवगळता इतर विभागांमधील प्रवेशाला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. विज्ञान विद्याशाखेतील काही विभागांमधील प्रवेश पूर्ण क्षमतेने झाले आहेत. मात्र, अर्ध्यांपेक्षा अधिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा कमी जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. स्पॉट ॲडमिशनच्या संख्येची माहिती विद्यापीठ प्रशासनाने देण्यास असमर्थता दर्शविली.

दहा ते बारा पानांचा ऑनलाइन अर्ज
विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसतानाही सीईटीद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविली. त्यानंतर उपलब्ध संख्यापेक्षाही कमी नोंदणी असतानाही दोन प्रवेश फेऱ्या जाहीर केल्या. त्यानंतरही २ ऑगस्ट रोजी स्पॉट ॲडमिशन जाहीर केले आहे. स्पॉट ॲडमिशनला येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली होती. वेगवेगळी कागदपत्रे अपलोड करण्यासह दहा ते बारा पानांची ऑनलाइन माहिती भरणे अनिवार्य होते. त्यामुळे जे विद्यार्थी प्रवेशाला आले त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागल्याची परिस्थिती 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आली.

विद्यापीठ बंद पाडण्याचा डाव; प्रक्रियेची चौकशी करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या विद्यापीठात पुरोगामी विचार जोपासला जातो. त्यामुळे उजव्या विचारसणीच्या सत्ताधाऱ्यांचा हे विद्यापीठ बंद पाडण्याचा डाव आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश घेऊ नयेत, यासाठीच किचकट प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्यही केले गेले नाही. या प्रवेश प्रक्रियेत दोषी असलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन अधिसभा सदस्य प्रा. हरिदास ऊर्फ बंडू सोमंवशी यांनी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिले. या निवेदनावर प्रा. सोमवंशी यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे दिग्विजय शिंदे, सादिक शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Cold response of students to the spot admission in the BAMU university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.