कोरोनाबरोबर शहरात थंडीची लाट, गार वारे, ढगाळ वातावरणाने हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 01:46 PM2022-01-12T13:46:41+5:302022-01-12T13:47:45+5:30
गाळ वातावरणाबरोबर वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे नागरिकांना बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागले.
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबर शहरात थंडीची लाट आली असून, मंगळवारी कडाक्याच्या थंडीने संपूर्ण शहराला हुडहुडी भरली. शहरावर दिवसभर धुक्याची चादर पसरली होती.
शहरात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत संपूर्ण शहर सकाळी धुक्यात बुडाले. अगदी दुपारपर्यंत धुक्याची चादर शहरावर कायम होती. शहर परिसरातील डोंगर दिसेनासे झाले होते. ढगाळ वातावरणाबरोबर वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे नागरिकांना बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागले. दुपारी काही मिनिटांसाठी सूर्यदर्शन झाले. शहरात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानात वाढ झाली, परंतु वातावरणातील बदलामुळे कडाक्याच्या थंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागले. उबदार कपडे परिधान करूनच नागरिकांनी घराबाहेर पडण्यास प्राधान्य दिला. शहरात नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून थंडी गायब झाली होती. मात्र, गेल्या ३ दिवसांपासून थंडीने पुनरागमन केले आहे.
असे राहिले तापमान
शहरात सोमवारी कमाल तापमान २७.८ आणि किमान तापमान ११.० अंश सेल्सिअस होते. मंगळवारी कमाल तापमान २५.५ आणि किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे.
महिनाभरापूर्वीच अशीच स्थिती
शहरात १ डिसेंबर रोजीही अचानक थंडी वाढली होती. या दिवशीही शहरात ढगाळ वातावरणामुळे गारव्यात प्रचंड वाढ झाली होती. अशाच वातावरणाचा नागरिकांना मंगळवारी पुन्हा एकदा अनुभव आला.