सिडकोच्या वाळूज महानगरातील सांडपाण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 06:09 PM2019-01-20T18:09:00+5:302019-01-20T18:09:45+5:30
नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे सोडण्यात येणारे सांडपाणी साई समर्थ सोसायटीतील रहिवाशांनी अडविल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर सिडकोने मध्यस्थी करून सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढला.
वाळूज महानगर : नागरी वसाहतीतून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे सोडण्यात येणारे सांडपाणी साई समर्थ सोसायटीतील रहिवाशांनी अडविल्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर सिडकोने मध्यस्थी करून सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढला. संबंधित सोसायट्यांना तात्काळ सेफ्टी टँक व शोषखड्डे तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सिडको वाळूज महानगरातील अक्षयतृतीया, सिल्व्हर पार्क, सारा आकृती, सारा व्यंकटेश, साई प्रतीक्षा, मिरजगावे साईनगरी, साईप्रसाद, बालाजीनगर, मिरजगाव, लक्ष्मीनगर आदी सोसायट्यांनी गट नंबर ४८ मधून वाहणाºया नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे सांडपाणी सोडले आहे. यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील साई समर्थ सोसायटीतील नागरिकांनी इतर सोसायटीचे नाल्यातून वाहणारे पाणी अडविले. त्यामुळे पाण्याचा फ्लो उलट दिनेश वाहून नाल्यातील घाण पाणी नागरी सोसायटीत साचले. सोसायटीतील रहिवाशांना ये-जा करण्याबरोबरच दुर्गंधीचा त्रास जाणवू लागला. तेव्हा सोसायटीतील रहिवाशांनी साई समर्थ सोसायटीतील नागरिकांची भेट घेऊन सदरील अडविलेले सांडपाणी सोडण्याची विनंती केली.
पण साई समर्थ सोसायटीतील रहिवाशांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. सांडपाण्यासाठी मार्ग मोेकळा करून देण्याची विनंती रहिवाशांनी सिडको प्रशासनाकडे केली. सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी पथकांसह घटनास्थळाला भेट दिली. जवळपास ९ सोसायट्यांनी अनधिकृतपणे लाईन जोडून नैसर्गिक नाल्यात मोकळ्यावर ड्रेनेज व सांडपाणी सोडल्याचे समोर आले.
साटोटे यांनी साई समर्थ सोसायटीतील नागरिकांची कशीबशी समजूत घालून तात्पुरत्या स्वरुपात नाल्यातील अडविलेले सांडपाणी सोडायला लावून सदरील सोसायट्यांना ड्रेनेज व सांडपाण्यासाठी तात्काळ सेफ्टी टँक व शोषखड्डे तयार करण्याच्या सूचना दिल्या.