कंटेनरमधून कोलगेटचे बॉक्स लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:02 AM2021-04-11T04:02:57+5:302021-04-11T04:02:57+5:30
वाळूज महानगर : गुजरात येथून कोलगेटचे बॉक्स घेऊन साजापूर शिवारात आलेल्या कंटेनरमधील जवळपास ३ लाखांचे कोलगटेचे बॉक्स गायब झाले ...
वाळूज महानगर : गुजरात येथून कोलगेटचे बॉक्स घेऊन साजापूर शिवारात आलेल्या कंटेनरमधील जवळपास ३ लाखांचे कोलगटेचे बॉक्स गायब झाले आहे. कंटेनर चालक व सुपरवायझर या दोघांनी संगनमत करून परस्पर हा माल लांबविल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
प्रदीपकुमार मणीराम सेन (रा. चिमडीगाव, ता.खेड, जि.पुणे) हे पार्कोट मेरीटिमा प्रा.लि. या ट्रॉन्सपोर्ट कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतात. या कंपनीचे कोलगेट पामोलिव्ह इंडिया लि. या कंपनीसोबत माल ने-आण करण्याचा करार झालेला आहे. २३ मार्चला गुजरात राज्यातील साणंद येथील टीव्हीएस कंपनीच्या गोदामातून कोलगेट पेस्टचे बॉक्स कंटनेर (पी.बी.१३,बी.सी.८८४०) मध्ये भरण्यात आला होता. सदरील माल साजापूर शिवारात टीव्हीएस कंपनीच्या गोदामात पोहोच करण्यासाठी कंटेनर चालक अबरार खान इस्तियाक खान (रा.उत्तर प्रदेश) हा गुजरात येथून निघाला होता. २६ मार्चला जीपीएस प्रणालीद्वारे हा कंटनेर साजापूर शिवारात आल्याचे ट्रॉन्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना समजले होते. यानंतर ट्रॉन्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंटेनरचालक अबरार खान याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता त्याचा मोबाइल बंद होता. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत चालक अबरार खान याचा मोबाइल बंद असल्याने तसेच त्याचा संपर्कही होत नसल्याने ट्रॉन्सपोर्ट कंपनीकडून त्यांचा कर्मचारी नवीनकुमार याच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी नवीनकुमार यास पर्यायी कंटेनर चालक इरफान खान यास माल गोदामात खाली करण्याच्या सूचना ट्रॉन्सपोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. या सूचनेवरून पर्यायी कंटेनरचालक इरफान हा कंटेनरजवळ गेला असता त्यास कंटेनरचे लॉक तुटलेले दिसून आले. यानंतर इरफानखान याने कंटेनरमधील कोलगेटचे बॉक्स साजापूर शिवारातील गोदामात उतरुन घेतले. यावेळी गोदाम सुपरवायझरने ४९ कोलगेटचे बॉक्स कमी आल्याची तक्रार ट्रॉन्सपोर्ट कंपनीकडे केली होती.
चालक व सुपरवायझरने बॉक्स लांबविले
साजापूरच्या गोदामात ३ लाखांचे ४९ कोलगेटचे बॉक्स कमी आल्याने ट्रॉन्सपोर्ट कंपनीकडून कंटेनरचालक अबरार खान व सुपरवायझर नवीनकुमार या दोघांशी मोबाइलवर संपर्क साधला. मात्र या दोघांचे मोबाईल बंद येत असल्याने या दोघांनी संगनमत करून कंटेनरमधील ३ लाखांचे कोलगेटचे बॉक्स परस्पर लांबविल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी ट्रॉन्सपोर्ट कंपनीचे शाखा व्यवस्थापक प्रदीपकुमार सेन यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून कंटेनरमधील ३ लाखांचा माल चोरी झाल्याची तक्रार देऊन चालक व सुपरवायझर या दोघावर संशय वर्तविला आहे. या प्रकरणी कंटेनरचालक अबरार खान व सुपरवाझयर नवीन कुमार या दोघाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.