भाजपा आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयाची तोडफोड
By Admin | Published: February 16, 2017 07:49 PM2017-02-16T19:49:47+5:302017-02-16T20:10:46+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोड प्रकरण आज चांगलेच चिघळले आहे. पँथर्स
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 16 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन दिवसापूर्वी झालेल्या तोडफोड प्रकरण आज गुरुवारी चांगलेच चिघळले आहे. पँथर्स सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार अतुल सावे यांचे सिडको एन-७ मधील बजरंग चौकातील कार्यालयावर दगडफेक करुन राडा केला.यावेळी कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आणि तेथील फलक तोडण्यात आले. ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ११फेब्रुवारी पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या पुण्यातिथी निमित्त आयोजित व्याख्यान महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई यांची पुण्यातिथी साजरी केली नसल्याचा आरोप करत बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले. याच्या प्रत्युत्तरादाखल भाजयुमो आणि अ.भा.विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहाची तोडफोड केली. यावेळी व्याख्यान समर्थक आणि विरोधक यांच्यात हाणामारी झाली होती. या प्रकरणात विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य व आमदार अतुल सावे यांनी बुधवारी उडी घेतली. आ. सावे यांनी कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेत व्याख्यान उधळून लावणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदविण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यामुळे पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आ. सावे यांना लक्ष्य करत गुरूवारी दुपारी त्यांचे बजरंग चौकातील संपर्क कार्यालय फोडले. सुरुवातीला हे कार्यकर्ते आ. सावे यांच्या खडकेश्वर मंदिर परिसरातील कार्यालयावर हल्ला करणार असल्याची कुणकुण आ. सावे यांना लागताच त्यांनी पोलिस संरक्षण मागितले. यामुळे बजरंग चौकातील कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा दगड विटाने फोडण्यात आल्या तसेच कार्यालयाबाहेरचे फलकाची पाटी उखडून फेकण्यात आले. यावेळी आरएसएस मुर्दांबाद, अतुल सावे मुर्दाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद अशी घोषणाबाजी करीत आणि पत्रके टाकू कार्यकर्ते तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच आ. सावे हे कार्यकर्त्यांसह तेथे दाखल झाले. पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती आणि कर्मचाऱ्यांनी काही मिनिटात तेथे धाव घेतली.
हिम्मत असेल तर समोर या-आ.सावे
या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना आ. सावे म्हणाले की, विद्यापीठाने आयोजित अशोक मोडक यांचे व्याख्यान उधळून लावणाऱ्या तसेच तेथे धूडगुस घालणाºया संबंधित संघटनेविरोधात गुन्हे नोंदविण्याची मागणी बुधवारी आपण केली. माझा विरोध करण्यासाठी कार्यालय फोडण्यात आले. पाठीमागे हल्ला करण्याऐवजी हिम्मत असेल तर थेट समोर यावे, असे आवाहन त्यांनी हल्लेखोरांना केले. याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात गुन्हे नोंदविणार असल्याचे ते म्हणाले.