४० ठिकाणी २४ हजार गणेशमूर्तींचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:05 AM2021-09-21T04:05:17+5:302021-09-21T04:05:17+5:30
गणेश विसर्जनासाठी १२ ठिकाणी विहिरी व ४० ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापन करून गणेश मूर्तींचे संकलन केले. ...
गणेश विसर्जनासाठी १२ ठिकाणी विहिरी व ४० ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापन करून गणेश मूर्तींचे संकलन केले. या संकलन केंद्रासाठी स्वतंत्र वाहन यांत्रिकी विभागाने उपलब्ध करून दिले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी प्रत्येक झोनमधील स्वच्छता कामगारांना नियुक्त केले. रविवारी सकाळी ९ वाजता यांत्रिकी विभागाच्या वर्कशॉपमध्ये प्रशासक पाण्डेय यांच्या हस्ते गणपतीची आरती करून संकलन केंद्रांसाठी ४० पथके रवाना केली. सकाळी ११ वाजेपासून गणेश मूर्तींचे संकलन सुरू झाले. विविध सार्वजनिक गणेश मंडळे, गणेश भक्तांकडून महापालिकेच्या पथकाकडे गणेश मूर्ती दिल्या जात होत्या. गणेश मूर्ती जमा होताच वाहनातून त्या मूर्ती प्रभागातील गणेश विसर्जन विहिरीवर नेल्या जात होत्या. त्या ठिकाणी गणेशाची विधिवत आरती करून विसर्जन केले जात होते. हर्सुल, सिडको एन-५, ज्योतीनगर, हनुमान चौक या ठिकाणी ऐनवेळी गणेश मूर्तींची संख्या वाढत गेल्यामुळे अतिरिक्त वाहनांची व्यवस्था यांत्रिकी विभागाने केली. त्यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळाला.
झोननिहाय संकलन
झोन- मूर्ती संकलन
१-९१०
२-८४५
३-२७६
४-६१९०
५-२७४४
६-३००८
७-५००७
८-३१२४
९-२६२६
एकूण- २४,७३०
निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
मनपाच्या पथकाने गणेश मूर्ती संकलन केंद्रावर निर्माल्य घेण्याची व्यवस्था केली होती. तसेच विसर्जन विहिरीवर देखील निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था होती. त्यासोबतच सामाजिक संस्थांकडून देखील निर्माल्य गोळा करण्यात आले. महापालिकेने दिवसभरात नऊ झोनमध्ये ५ टन निर्माल्य जमा केल्याचे नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.