घाटी रुग्णालयातील २५० वैद्यकीय शिक्षकांचे सामुहिक रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 03:59 PM2022-02-04T15:59:39+5:302022-02-04T16:00:10+5:30
प्रशासनाकडून डाॅक्टरांना मिळणाऱ्या वागणूकीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
औरंगाबाद : महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे (एमएसएमटीए) शिष्टमंडळ मुंबईत वैद्यकीय शिक्षण सचिवांना भेटीसाठी गेल्यावर त्यांना अपमानास्पद वागणूक देवून असंसदीय भाषेत अपमानित केल्याच्या निषेधार्थ शनिवारी घाटीतील अडिचशे डाॅक्टरांनी सामुहीक रजा घेत असल्याची पुर्वसुचना प्रशासनाला दिली.
एमएसएमटीए ची शुक्रवारी बैठक पार पडली. यात वैद्यकीय शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित मागण्या प्राधान्याने सोडवा. तसेच अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमीत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाकडून डाॅक्टरांना मिळणाऱ्या वागणूकीचा निषेध व्यक्त करण्यात आला. संतप्त भावना वैद्यकीय शिक्षकांनी व्यक्त केल्या. ओपीडी, आयपीडीत कोणतीही सेवा दिली जाणार नसल्याचे स्पष्ठ केले.
त्यानंतर सर्व वरीष्ठ डाॅक्टरांनी प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे यांना सामुहीक रजेच्या आंदोलनाची पुर्वसुचना व मागण्यांचे निवेदन संघटनेकडून अध्यक्ष डाॅ. भारत सोणवणे यांनी दिले. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डाॅक्टरही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. तर डाॅ. रोटे यांनी वैद्यकीय शिक्षकांच्या भावना डिएमईआरला कळवू. तर वैद्यकीय अधिक्षक डाॅ. काशिनाथ चौधरी म्हणाले, उद्या डाॅक्टरांचे आंदोलन असल्याने निवासी डाॅक्टरांच्या मदतीने रुग्णसेवा देवू. तसेच नियोजित शस्त्रक्रीया होणार नाही. केवळ आपत्कालीन शस्त्रक्रीया होतील.