जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अंगरक्षकाला कारचालकाची अरेरावी
By | Published: December 2, 2020 04:00 AM2020-12-02T04:00:04+5:302020-12-02T04:00:04+5:30
औरंगाबाद : रस्त्यावर भांडण करून वाहतुकीला अडथळा आणू नका, असे सांगणाऱ्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि त्यांच्या अंगरक्षकाला एका ...
औरंगाबाद : रस्त्यावर भांडण करून वाहतुकीला अडथळा आणू नका, असे सांगणाऱ्या जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि त्यांच्या अंगरक्षकाला एका कारचालकाने अरेरावीची भाषा वापरली. एवढेच नव्हे तर अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.२९) सकाळी ९:२० वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील आंबेडकरनगर चौकात घडली. गुन्हा नोंदवून सिडको पोलिसांनी आरोपीला अटक केली.
शशांक अशोक वाघ असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे रविवारी सकाळी कलाग्राम येथे मतपेट्यांची पाहणी करून कारने कार्यालयाकडे परत जात होते. अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गणपती इंगळे त्यांच्यासोबत होते. आंबेडकरनगर चौकात रिक्षा आणि कार रस्त्यात उभी होती. दोन्ही वाहनांचे चालक आपसात हाणामारी करीत होते. यामुळे चालकाने कार उभी केली आणि अंगरक्षक इंगळे हे भांडण सोडविण्यासाठी गेले. कारमध्ये जिल्हाधिकारी आहेत. रस्त्यावर भांडू नका, असे त्यांनी दोघांना सांगितले असता रिक्षाचालक तिथून निघून गेला. तर कारचालक शशांक हा इंगळे त्यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. एवढेच नव्हे तर त्याने इंगळे यांना धक्काबुक्की केली. हे पाहून जिल्हाधिकारी कारमधून उतरले आणि त्यांनी कार चालक शशांकला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘त्याने तुम्ही कलेक्टर असो अथवा कोणी, तुम्हाला काय करायचे करून घ्या?’ असे उर्मट बोलून तो कार घेऊन तेथून निघून गेला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अंगरक्षक इंगळे त्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
====
चौकट
आरोपीला रात्री अटक
आरोपी शशांक हा आरटीओ अधिकाऱ्याचा तरुण मुलगा आहे. तो उस्मानपुरा परिसरात व्यायाम शाळा चालवितो. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होताच सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी आणि अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तात्काळ आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.