अन् जिल्हाधिकारी स्वत: फिर्यादीला घेऊन गेले गुन्हा दाखल करायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:04 AM2021-04-17T04:04:31+5:302021-04-17T04:04:31+5:30

बिडकीन/ पैठण : येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा प्रकार ११ एप्रिल रोजी घडला होता. मात्र, ...

The Collector himself took the plaintiff to file a case | अन् जिल्हाधिकारी स्वत: फिर्यादीला घेऊन गेले गुन्हा दाखल करायला

अन् जिल्हाधिकारी स्वत: फिर्यादीला घेऊन गेले गुन्हा दाखल करायला

googlenewsNext

बिडकीन/ पैठण : येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा प्रकार ११ एप्रिल रोजी घडला होता. मात्र, आरोपीच्या परिसरातील दहशतीमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची हिंमत होत नव्हती. ही बाब जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना माहिती पडताच त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धीर देत त्यांच्यासह बिडकीन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करायला लावली. याप्रकरणी आरोपी फहाद हुसैन चाऊस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आरोपी फहाद हुसैन चाऊस हा हाताला मार लागल्याने रुग्णालयात आला होता. अधिपरिचारिका रेखा डिहोळकर त्याच्यावर उपचार करीत असताना तो अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत होता. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गोरे त्याला समजावण्यास गेले असता, आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली होती. माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी धाव घेतली होती. या घटनेनंतर आरोपीच्या दहशतीने डॉ. गोरे यांनी तक्रार दिली नव्हती. सदर घटनेची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली होती. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धीर देऊनही डॉ.गोरे यांची फिर्याद देण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा शुक्रवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः बिडकीन येथे येऊन डॉ. संजय गोरे यांना फिर्याद देण्यासाठी समजावले व त्यांना स्वतःच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करायला लावला. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होईपर्यंत अडीच तास जिल्हाधिकारी पोलीस ठाण्यात बसून होते. यानंतर डॉ. गाेरे यांच्या फिर्यादीवरुन बिडकीन पोलिसांनी फहाद चाऊसवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीला शोधून त्वरित अटक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जि. प. सीईओ मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण आगाज, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली देशपांडे आदी उपस्थित होते.

काेट

सर्व अधिकारी म्हणजे माझे कुटुंब आहे

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी डॉ. संजय गोरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. प्रकृतीची चौकशी केल्यानंतर, तुम्ही म्हणजे माझे कुटुंब आहात. आपल्या सगळ्यांना मिळून जिल्ह्याची काळजी घ्यायची आहे. मात्र हे होत असताना जर काही अन्याय होत असेल तर कायदेशीर पद्धतीने आवाज उठवलाच पाहिजे,

तसेच अन्याय सहन करणे हा मोठा गुन्हा असल्याचं त्यांनी डॉ. गोरे यांना सांगितले. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आणि एक जिल्हाधिकारी नाही, तर मोठा भाऊ म्हणून तुमच्याकडे आलो असल्याचे त्यांनी डाॅ. गोरे यांना सांगितले.

Web Title: The Collector himself took the plaintiff to file a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.