जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा
By Admin | Published: August 19, 2016 12:38 AM2016-08-19T00:38:53+5:302016-08-19T00:59:13+5:30
उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने
उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निदर्शनेही केली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील दलित, आदिवासी, पारधी, मांग, महार या समाजातील भूमिहिनांनी गायरान, फॉरेस्टच्यो जमिनी वहितीखाली आणून आपली उपजिविका भागवित आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार उभ्या पिकांचा पंचनामा करणे अपेक्षित आहे. परंतु, शासन आणि प्रशासनही याकडे डोळेझाक करीत आहे. वारंवार पाठपुरवा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने १८ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुताळ्यापासून मोर्चा निघाला. हा मोर्चा शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आल्यानंतर निदर्शनेही करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना बजरंग ताटे यांनी केसरी कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य देण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, सरकारी गायरान जमीन व फॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहे. सदरील जागा त्या-त्या कुटुंबाच्या नावे करावी आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या. मोर्चामध्ये भाई बजरंग ताटे, माया शिंदे, यशवंत फडतरे, हनुमंत पाटुळे, विक्रम शिंदे, वाल्मिक सगट, मंगल सोनटक्के, दादाराव कांबळे, नवनाथ शिंदे, तारामती कसबे, राजाभाऊ मस्के, सुमन काळे, खुदबुद्दीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)