जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:30 PM2021-02-11T12:30:39+5:302021-02-11T12:31:03+5:30
corona vaccine १६ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत एकूण २३ लसीकरण केंद्रांवर १५ हजार १३८ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोविड -१९ लसीकरणाबाबत विश्वासार्हता वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी आज (११ फेब्रवारी) सकाळी ११ वाजता जिल्हा रुग्णालयात लस घेतली. लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी मोठयाप्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औरंगाबाद जिल्हयातील शासकीय व अशासकीय आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना १६ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत एकूण २३ लसीकरण केंद्रांवर १५ हजार १३८ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.
आतापर्यंत केवळ ४५ टक्के लसीकरण
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना व दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली, तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे केवळ ४५ टक्के लसीकरण झाले. मर्यादित लसीकरण केंद्रे, भीती, जनजागृतीकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा हा परिणाम आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या केंद्रांची संख्या, खासगी रुग्णालयांच्या सहभागासह लसींचा पुरवठा, जनजागृती वाढविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.