जिल्हाधिकारी म्हणाले... तर लॉकडाऊनची १० मिनिटांत ऑर्डर निघेल,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:04 AM2021-03-25T04:04:52+5:302021-03-25T04:04:52+5:30
औरंगाबाद : ‘लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागणार नाही. १० मिनिटांत ऑर्डर निघेल; परंतु सामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी ...
औरंगाबाद : ‘लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागणार नाही. १० मिनिटांत ऑर्डर निघेल; परंतु सामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी अंशत: लॉकडाऊन केले आहे. त्यातही नागरिक शिस्त पाळत नसतील, तर मग पर्याय नाही,’ असा गर्भित इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी दिला. नागरिकांनी सहकार्य करावे, शासनाने लागू केलेले सर्व नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्रतेने उसळी घेत आहे. जनसामान्यांच्या रोजीरोटीवर गदा येऊ नये, म्हणून थेट लॉकडाऊनऐवजी अंशत: लॉकडाऊन केले आहे. परंतु रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच राहिला, कोरोनाची शिस्त नागरिकांनी पाळली नाही तर येणाऱ्या काही दिवसांत पूर्ण लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही, यावर त्यांनी जोर दिला.
जिल्हाधिकारी म्हणाले, अंत्ययात्रांना गर्दी करू नये, फक्त २० नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आदेश असताना गाढेजळगांव परिसरात ५०० हून अधिक नागरिक अंत्ययात्रेत सहभागी होते. करमाड पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी विवाह सोहळे होत असल्याची माहिती आली आहे. त्याबाबत शहानिशा करून गुन्हे दाखल करण्यात येतील.
गर्दी करून कार्यक्रम घ्यायचे आणि पुन्हा कोरोना संसर्ग झाल्यावर प्रशासनावर खापर फोडायचे ही पद्धत योग्य नाही. शहरात काही भागांमध्ये कोरोनाची शिस्त पाळली जात नाही. काही लोकप्रतिनिधी पोलिसांशी हुज्जत घालतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा जल्लोष करण्यात आला. हे सगळे ज्यांनी केले, त्यांनीदेखील भान ठेवणे गरजेचे होते. या सगळ्या घटना आपणास लॉकडाऊनकडे घेऊन जात असल्याचे सांगत नांदेड, परभणीमध्ये लॉकडाऊन झाले आहे. औरंगाबादचा रुग्णवाढीत क्रमांक वरचा आला आहे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
घाटीमध्ये १०० बेड्स वाढविण्यासाठी प्रयत्न
घाटीमध्ये १०० बेड्स वाढविण्यासाठी तयारी केली आहे. ४६ आयसीयूचे बेड्स वाढतील. यासाठी बुधवारी दिवसभर बैठकांचे सत्र झाले. घाटीत सर्व काही तयार आहे, त्यामुळे तेथे बेड्स वाढविणे सोपे जाणार आहे. बरीचशी व्यवस्था केली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.