जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वाळूमाफियांचे ट्रॅक्टर, केणी मशीन जाळून केले नष्ट, १५० ब्रास साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 07:35 PM2022-04-01T19:35:48+5:302022-04-01T19:36:41+5:30

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पथकासह कारवाईसाठी नदीपात्रात उतरेपर्यंत तस्करांच्या यंत्रणेला खबर मिळाली नाही.

Collector-Superintendent of Police team destroys sand mafias tractors, sand machine, seizes 150 brass sand stocks | जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वाळूमाफियांचे ट्रॅक्टर, केणी मशीन जाळून केले नष्ट, १५० ब्रास साठा जप्त

जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वाळूमाफियांचे ट्रॅक्टर, केणी मशीन जाळून केले नष्ट, १५० ब्रास साठा जप्त

googlenewsNext

पैठण (औरंगाबाद ) : स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला भणक लागू न देता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलीस अधीक्षक निमित्त गोयल यांनी स्वतः पथकासोबत जात गुरूवारी मध्यरात्री गोदावरी पात्रात वाळू माफियांवर कठोर कारवाई केली. पथकाने दीडशे ब्रास वाळूसाठा जप्त करून तस्करीसाठी वापरले जाणारे दोन ट्रॅक्टर, केणी मशीन व इतर साहित्य जाळून नष्ट केले.

पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातील एकाही वाळुपट्ट्याचा लिलाव झालेला नाही. परंतु,  स्थानिक अधिकऱ्यांवर नजर ठेवून तस्करांकडून सातत्याने वाळू उपसा सुरू आहे. पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने गुरुवारी मध्यरात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमीत गोयल,  उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांच्यासह पथकाने पाटेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात धाड टाकली. 

पथक तिथे पोहोचले त्यावेळी गोदावरी नदीपात्रामध्ये विना क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर, वायर रोप व यारी मशीनद्वारे केनीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू होता. पथकाला पाहताच वाहने व साहित्य तेथेच सोडून अंधारात गोदावरी पात्रातील पाण्यात उड्या मारून तस्करांनी धूम ठोकली. पथकाने जवळपास १५० ब्रास वाळूसाठा जप्त करून पाटेगाव तलाठ्याच्या ताब्यात देण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले. तसेच यापुढेही अवैध वाळू उपशावर स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण कारवाई करणार आहेत. यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.  

कारवाईच्या भितीने तस्कर फरार...
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पथकासह कारवाईसाठी नदीपात्रात उतरेपर्यंत तस्करांच्या यंत्रणेला खबर मिळाली नाही. यामुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापुढे तस्करावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान, पथकाची कारवाई सुरु असल्याचे समजताच पैठण ते हिरडपुरी दरम्यान रात्री सुरू असलेला अवैध वाळू उपसा बंद करून तस्कर फरार झाले. शुक्रवारी सुध्दा तस्करी करणारे शहरातून व गावातून फरार असल्याची माहिती आहे. 

Web Title: Collector-Superintendent of Police team destroys sand mafias tractors, sand machine, seizes 150 brass sand stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.