कर्मचारी संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय पडले ओस; सर्वसामान्य नागरिक वेठीस
By विकास राऊत | Published: July 19, 2024 12:15 PM2024-07-19T12:15:45+5:302024-07-19T12:16:59+5:30
कार्यालयात शेकडो संचिका तुंबल्या; संपावर तोडगा नाही, पुढच्या आठवड्यात चर्चा
छत्रपती संभाजीनगर : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा न निघाल्यामुळे चार दिवसांपासून सामान्यांचे हाल होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा हतबल असून, संपामुळे अभ्यागतांची गर्दी कमी झाल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडले होते.
मंगळवारपर्यंत संप?
गुरुवारी संपावर तोडगा निघतो का, याकडे संघटनेचे लक्ष होते, परंतु महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दोन दिवसांनी चर्चा करू, असे संघटनेच्या अध्यक्षांना नाशिक येथे सांगितले. त्यामुळे मंगळवारपर्यंत संप सुरूच राहणार, अशी परिस्थती सध्या तरी आहे. १८ वर्षांपासून आकृतीबंध मंजूर होत नाही. महसूल यंत्रणेवर विविध योजनांच्या कामांचा भार आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. संपावर अद्याप तोडगा निघाला नाही, त्यामुळे संप सुरूच ठेवण्यात संघटना कायम आहे. या संपाला इतर संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यात ४३७ कर्मचारी सुमारे ९०० कर्मचाऱ्यांचे कामकाज सांभाळत आहेत, तर विभागातील सुमारे ५ हजार कर्मचाऱ्यांचे काम ३ हजार कर्मचारी करीत आहेत. परिणामी, अतिरिक्त कामाच्या ताणामुळे कर्मचारी तणावात आहेत.
१८ वर्षांपासून तोच आकृतीबंध
२००६ पासून आकृतीबंध मंजूर करून त्यानुसार कर्मचारी भरती नाही. कमी कर्मचाऱ्यांवर काम करावे लागते आहे. एकेका कर्मचाऱ्यावर तीन-तीन टेबलचा भार आहे. असे असताना शासन चार दिवसांपासून चर्चेला देखील बोलावत नाही, हे खेदजनक आहे. गुरुवारी महसूल मंत्र्यांसोबत संघटना अध्यक्ष बोलले, परंतु त्यांनी दोन दिवसानंतर मागण्यांबाबत बोलणार असल्याचे नमूद केले.
-परेश खोसरे, महसूल कर्मचारी संघटना, जिल्हाध्यक्ष
संचिका टेबलवरच
संपकरी अव्वल कारकुनांच्या टेबलवरच संचिका असतील. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारीदेखील कार्यालयात नाहीत. प्रशासकीय सुनावण्यांची कामे लांबली आहेत. लाडकी बहीण योजनेचे काम देखील ठप्प पडले आहे. संपावर कधी तोडगा निघतो याकडे लक्ष आहे.
-विनोद खिराेळकर, निवासी उपजिल्हाधिकारी
संप कधीपासून : १५ जुलैपासून
किती मागण्या : १४ प्रकारच्या विविध मागण्या
कोण संपावर : वर्ग क व ड श्रेणीतील कर्मचारी
किती संचिका तुंबल्या : ५००
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय : ४३७ कर्मचारी संपावर
कोणत्या विभागावर परिणाम : जमिनीसह पुरवठा व इतर विभाग, सामान्य प्रशासन, गृहशाखा, पुरवठा विभाग, पुनर्वसन विभाग
मराठवाड्यातील संपाबाबत आकडेवारी
मराठवाडा : ३ हजार कर्मचारी सहभाग
विभागीय आयुक्तालय : ४७,
जालना :२४९-
परभणी : ४६४
हिंगोली : १५९
नांदेड : ७२७
बीड : ४०८
लातूर : ३४२
धाराशिव : २१०