'महाविद्यालयातील कर्मचारी काम करत नाहीत, वेतन परत घ्या'; संस्थाचालकाचे शासनाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:49 IST2025-01-23T18:48:53+5:302025-01-23T18:49:45+5:30

मासिक वेतनासाठी मागितले ८८ लाख ९१ हजार रुपये १८ दिवसांनी केले परत, खुलताबादच्या कोहिनूर महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार

College employees are not working, take back their salaries; Institution director's letter to the government | 'महाविद्यालयातील कर्मचारी काम करत नाहीत, वेतन परत घ्या'; संस्थाचालकाचे शासनाला पत्र

'महाविद्यालयातील कर्मचारी काम करत नाहीत, वेतन परत घ्या'; संस्थाचालकाचे शासनाला पत्र

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न खुलताबाद येथील अनुदानित कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने डिसेंबर २०२४ या महिन्याच्या वेतनासाठी उच्च शिक्षणच्या विभागीय कार्यालयाकडे ८८ लाख ९१ हजार ४२५ रुपयांची मागणी केली. त्यानुसार सहसंचालक कार्यालयाने १ जानेवारी रोजी महाविद्यालयास वेतन अदा केले. हे वेतन प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना न देता संस्थाचालकाने १८ दिवसांनी शासनास परत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खुलताबाद येथे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त कोहिनूर शिक्षण संस्था संचलित कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयास शासनाकडून वेतनासाठी १०० टक्के अनुदान मिळते. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रति महिन्याप्रमाणे डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी सहसंचालक कार्यालयाकडे ८८ लाख ९१ हजार ४२५ रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार सहसंचालक कार्यालयाने १ जानेवारी रोजी धनादेशाद्वारे वेतन अदा केले. हे वेतन तीन दिवसांमध्ये संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग करणे आवश्यक होते. मात्र, संस्थेचे अध्यक्ष डॉ. मझहर खान यांनी १८ जानेवारी रोजी सहसंचालकांना पत्र पाठवून आमच्या संस्थेतील कर्मचारी कर्तव्यामध्ये कसूर करीत आहेत. विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी काही प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी असून, महाविद्यालयाच्या अकाऊंटमध्ये अफरातफर झाली आहे. त्यामुळे डिसेंबर २०२४ या महिन्याचे वेतन शासनास परत करीत आहे. तसेच संस्था जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवावे, असेही पत्रात म्हटले आहे. या पत्रासोबत वेतन परत करण्याचा धनादेशही देण्यात आला.

सहसंचालकांची महाविद्यालयात धाव
संस्थेच्या अध्यक्षाने १८ जानेवारी रोजी सहसंचालकांना पत्र लिहिले आहे. हे पत्र सहसंचालक कार्यालयास २० जानेवारी रोजी मिळाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी महाविद्यालयाला भेट दिली. त्याठिकाणी प्राध्यापक, प्राचार्यांसोबत संवाद साधला. त्याचवेळी संस्थाचालकांसोबत त्यांची जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी प्रचंड दहशतीखाली असल्याचेही समजते. याविषयी संस्थाध्यक्ष डॉ. मजहर खान आणि प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: College employees are not working, take back their salaries; Institution director's letter to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.