मित्राने शिवीगाळ केल्याने महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 06:15 PM2019-04-01T18:15:09+5:302019-04-01T18:17:12+5:30
पोलिसांनी आरोपीला अटक करून तिच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी सुरु केली आहे.
औरंगाबाद: वाढदिवसाच्या कार्यक्रमात मित्राने शिवीगाळ केल्याने अपमानित झालेल्या तरूणीने घरी येऊन आत्महत्या केल्याची घटना मुकुंदवाडीतील अंबिकानगर येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या मित्राला अटक केली. घराशेजारी राहणाऱ्या मुलीसह वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मित्रांची पोलिसांनी चौकशी सुरू केली.
स्वप्नील डिब्बे (वय २४,रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील तरूणाचे नाव आहे. तर पूजा मच्छिंद्र गायकवाड (वय १८, रा. अंबिकानगर)असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यू.जी. जाधव म्हणाले की, मृत पूजा हिने नुकतीची बारावी बोर्ड परिक्षा दिली होती. सीईटी आणि नीट परिक्षेची ती तयारी करीत होती. सिडको एन-१ ते कॅनॉट रस्त्यावरील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये ती नीट आणि सीईटची तयारी करण्यासाठी जात. रविवारी सायंकाळी कॅनॉट येथे तिच्या क्लासमधील शुभम वाघ या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त सर्व मित्र-मित्रांनी शुभमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कॅनाट मार्केट येथे जमले होते. या वाढदिवसाकरीता पूजाही गेली होती.
दरम्यान, पूजाचा मित्र आरोपी स्वप्नील डिब्बे हा सुद्धा तिथे आला होता. स्वप्नील हा तिच्यापेक्षा सात ते आठ वर्षांनी मोठा असून तो अॅक्सीस बँकेत नोकरी करतो. तेथे त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर पूजा सरळ घरी आली त्यावेळी तिची आई आणि बहिण कामानिमित्त बाहेर होती. घरी कोणीही नसताना तिने लगेच तेथून आईला फोन लावून कोठे आहे असे विचारले. तेव्हा थोड्यावेळाने घरी येते असे आईने तिला सांगितले. नंतर तीने तिचा मित्र स्वप्नीलला फोन करून ती आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तेव्हाही त्याने तिला असे करू नको, असे सांगत शिवीगाळ केली. नंतर तिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने तिची आई घरी आल्यानंतर त्यांना ही घटना दिसली. याप्रकरणी पूजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्नीलला अटक केली असून तिच्या वर्गमित्र आणि मैत्रिणींची चौकशी सुरू केली.