बाबासाहेबांच्या स्वप्नांचा झाला कोंडवाडा
By सुमेध उघडे | Published: November 6, 2017 12:43 AM2017-11-06T00:43:54+5:302017-11-07T12:45:28+5:30
नागसेनवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाचे हाल एखाद्या कोंडवाड्यासारखे झाले आहेत
- सुमेध उघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नागसेनवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाचे हाल एखाद्या कोंडवाड्यासारखे झाले आहेत. राहण्यास नीटनेटकी खोली व पिण्यास पाणी या मूलभूत सोयीसुद्धा येथे नाहीत.
मराठवाड्यासारख्या उपेक्षित भागातील नागरिकांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या विचाराने विद्यापीठ सुरू होण्याच्या आधी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाविद्यालयाची स्थापना केली. आज केवळ मराठवाड्यातीलच नाही तर विदर्भ व खान्देश भागातील विद्यार्थीदेखील बाबासाहेबांच्या प्रेरणेने येथे शिक्षण घेण्यास येतात; परंतु येथील विधि महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी वसतिगृहात आल्यास या विद्यार्थ्यांना वेगळेच चित्र दिसते.
पलंगाला काठीच्या टेकूचा आधार
राऊंड हॉस्टेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वसतिगृहाची इमारत वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. मात्र, वसतिगृहाच्या आतील चित्र खूपच विदारक आहे. येथे बाथरूम आहे; पण त्यात पाणी नाही. चौकट आहे; पण दरवाजे व खिडक्या नाहीत. खोलीतील पलंग कसेतरी काठ्या व खुर्च्यांच्या टेकूवर उभे आहेत.
रंग उडालेल्या व प्लास्टर पडलेल्या भिंती, जागोजागी कोष्ट्याच्या जाळ्या, गळणारे कौलाचे छत असे भयानक चित्र येथे पाहावयास मिळते. एखाद्या कोंडवाड्यास शोभेल अशा भयाण वातावरणातही विद्यार्थी दुसरा काही पर्याय नाही म्हणून राहतात. यातच येथे राहणाºया विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती जेमतेम असल्याने ते बाहेर राहण्याचा विचारदेखील करू शकत नाहीत.
पाणी साठवण्याची व्यवस्थाच नाही
एखाद्या कोंडवाड्यासारखे असलेल्या या वसतिगृहात रोज सकाळी नळाला पाणी येते; परंतु ते साठवून ठेवण्याची व्यवस्थाच नाही. विद्यार्थी कसे तरी त्यांच्याकडील छोट्या बॉटल व बकेटमध्ये पाण्याचा साठा करतात. यामुळे ज्या दिवशी पाणी येत नाही तेव्हा विद्यार्थ्यांना शेजारील कब्रस्थानमधील हौदात साठवलेल्या पाण्यावर तहान भागवावी लागते.
स्तंभ झाकोळला
राऊंड वसतिगृहाची शान असणारा अशोक स्तंभ त्याच्या भोवती अनियंत्रित वाढ झालेल्या झाडांनी झाक ोळून गेला आहे.
विद्यार्थी स्वत: करतात स्वच्छता
वसतिगृहात नियमित साफसफाई होत नसल्याने विद्यार्थी स्वत: आपल्या खोल्यांसमोरील भाग स्वच्छ करतात.
तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने या भागात बºयाचदा साप निघतात. खोल्यांचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या असल्याने ते यातून विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये सहज प्रवेश
करतात.
वाढलेल्या गवताने आजारास आमंत्रण
वसतिगृहात प्रवेश करताच चारी बाजूंनी गुडघ्यापर्यंत वाढलेले गाजर गवत दिसते. तसेच जागोजागी पडलेला कचºयाचा खच, साचलेले पाणी यामुळे येथे डासांचा उच्छाद आहे. दिवसासुद्धा डास चावत असल्याने मच्छरदानीतच राहावे लागते, अशा वातावरणात डेंग्यू, मलेरियासारखी आजाराची लागण या विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणास बोलावे?
निवेदने दिली, तक्रारी केल्या; पण या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही. येथे रेक्टरसुद्धा नाही. केवळ एक शिपाई येथे रोज आराम करण्यास येतो. ना कोणत्या नेत्याला आमच्या समस्यांची जाण आहे ना या ऐतिहासिक वास्तूची कदर. आमच्या आधीचे विद्यार्र्थीसुद्धा तुम्ही फक्त अभ्यास करा, काही बदल होणार नाही हेच सांगतात, असे सध्या येथे राहत असलेले विद्यार्थी सांगतात; पण या परिस्थितीपुढे हतबल न होता हे विद्यार्थी खोलीत लावलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेकडून प्रेरणा घेत स्वत:स अभ्यासात मग्न करून घेतात.
बाबासाहेबांच्या स्मृती विस्मरणात
संपूर्ण नागसेनवनात बाबासाहेबांच्या स्मृती आहेत. या वास्तूमध्येही बाबासाहेबांच्या स्मृती आहेत. किमान त्या स्मृतिस्थळाचा विचार करून या वसतिगृहाची डागडुजी करण्यात यावी, अशी अपेक्षा हे विद्यार्थी करतात. कदाचित, यामुळेच प्रसिद्ध आंबेडकरवादी कवी वामनदादा कर्डक यांनी ‘भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते...’ अशा आशयाचे गीत रचले असेल. या चीड आणणा-या स्थितीवर भीमशक्ती विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सचिव अक्षय थोरात यांनी विधि महाविद्यालयाची प्राचार्य निरानंद बेहरा यांना एक निवेदन दिले आहे. यावर त्यांच्याकडून काही ठोस आश्वासन मिळाले नाही. तसेच लोकमत प्रतिनिधीने प्राचार्यांना मोबाइलवर संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.