महाविद्यालयांची झाडाझडती सुरु
By Admin | Published: May 20, 2014 01:31 AM2014-05-20T01:31:52+5:302014-05-20T01:35:13+5:30
औरंगाबाद : उच्च शिक्षण विभागाच्या आदेशाने शिक्षण सहसंचालक कार्यालयाने चार जिल्ह्यांतील अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची तपासणी मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे.
औरंगाबाद : उच्च शिक्षण विभागाच्या आदेशाने शिक्षण सहसंचालक कार्यालयाने चार जिल्ह्यांतील अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची तपासणी मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ६० महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतील विविध खाजगी शिक्षण संस्थांची ३९२ अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कला, वाणिज्य, विज्ञान, विधि, शिक्षणशास्त्र, बीबीए, बीसीए, बीसीएस, शारीरिक शिक्षणशास्त्र आदी महाविद्यालयांचा समावेश आहे. महाविद्यालये सुरू करताना संबंधित शिक्षण संस्थांनी त्यांच्याकडे नियमाप्रमाणे सर्व सोयी- सुविधा, अकॅडमिक स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असल्याचे लेखी दिले होते. तसेच शासनाच्या सर्व अटीनुसार महाविद्यालय चालविण्यात येईल, अशी हमी दिली होती. प्रत्यक्षात मात्र, अनेक महाविद्यालये चार खोल्यांच्या किरायाच्या घरात सुरू आहेत. निम्म्या महाविद्यालयांत कायमस्वरूपी प्राचार्य नाहीत. एवढेच नव्हे तर तेथील शिक्षकांनाही शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन आणि भत्ते दिले जात नाहीत. अशा महाविद्यालयांमुळे शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. याबाबत सतत ओरड झाल्यानंतरही शासनाने अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालये वगळता राज्यातील सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने आठ दिवसांपूर्वीच महाविद्यालयांना पत्र पाठवून आम्ही तपासणीसाठी येणार असून, आवश्यक ती माहिती तयार ठेवण्याचे कळविले होते. कोणती माहिती घेण्यात आली औरंगाबाद विभागातील ३६५ महाविद्यालयांच्या तपासणीस सोमवारी सकाळपासूनच प्रारंभ झाला. चार जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेली ३० पथके आज ६० महाविद्यालयांत धडकली. पथकाने तेथील प्राचार्य, प्राध्यापकांची पदे भरलेली असल्यास त्यांची शिरगणती करण्यात आली. महाविद्यालयाची इमारत, लायब्ररी, खेळाचे मैदान याविषयीची माहिती जाणून घेण्यात आली. या तपासणी मोहिमेविषयी औरंगाबाद विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. मोहम्मद फय्याज म्हणाले की, ही तपासणी करण्यासाठी ३० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाने रोज दोन महाविद्यालयांची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील २४ महाविद्यालयांची तपासणी औरंगाबाद जिल्ह्यासाठी १२ पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने शहरातील देवगिरी महाविद्यालय, मिलिंद कला व वाणिज्य महाविद्यालय, नवखंडा कॉलेज, राजीव गांधी संगणक महाविद्यालय, एमजीएम जर्नालिझम कॉलेज, एमजीएम बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, चेतना महाविद्यालय, मराठवाडा अध्यापक महाविद्यालय त्याचप्रमाणे शहर आणि ग्रामीण भागातील २४ महाविद्यालयांची तपासणी केली. जालना जिल्ह्यासाठी ५ पथके, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी अनुक्रमे ८ आणि ५ पथके स्थापन करण्यात आलेली आहेत.