गंभीर दुष्काळतही महाविद्यालयांना जाग येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 07:38 PM2018-11-01T19:38:45+5:302018-11-01T19:39:40+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्य सरकारने परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सूट मिळण्याच्या योजनेत सहभागी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तब्बल ७० महाविद्यालयांनी प्रोफाईलच अपडेट केली नाही. यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात दिलासा देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज प्रतिपुर्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत ६६५ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी महाविद्यालयांनी स्वत:चे लॉग इन आयडी आणि पासवर्ड घेऊन जात प्रोफाईल अपडेट करण्याची गरज आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयाने महाविद्यालयांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड देऊनही तब्बल ७० महाविद्यालयांनी अद्यापही प्रोफाईल अपडेट केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या महाविद्यालयांशी वारंवार संपर्क साधूनही त्यास प्रतिसाद देण्यात येत नाही. या महाविद्यालांनी प्रोफाईल अपडेट केल्याशिवाय विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी आॅनलाईन अर्जच दाखल करता येणार नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पारंपारिक, विधि, बीबीए, बीसीए आदी ३६४ महाविद्यालयांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले. यातील २९४ महाविद्यालयांनी गुरूवारपर्यंत (दि.१) प्रोफाईल अपडेट केले आहे. मात्र, उर्वरित ७० महाविद्यालये अपडेट होण्यात दिरंगाई करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरता येत नसल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातुन देण्यात आली. ज्या महाविद्यालयांनी प्रोफाईल अपडेट केले त्या महाविद्यालयातून प्रतिदिन मोठ्या संख्येने विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करत आहेत.
सर्वाधिक संख्या औरंगाबाद जिल्ह्यात
शिष्यवृत्तीसाठी प्रोफाईल अपडेट करण्यात दिरंगाई करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांचा समावेश आहे. या खालोखाल बीड जिल्ह्यातील १३ तर उर्वरित उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी ८, ९ महाविद्यालयांचा समावेश आहे. प्रोफाईल अपडेट न करणारी ही सर्व महाविद्यालये कायम विनाअनुदानित आहेत, हे विशेष!