पॉश म्हणवल्या जाणाऱ्या एन-२, एन-३, एन-४ या वसाहतींना समस्यांनी घेरलेय
By साहेबराव हिवराळे | Published: March 21, 2024 06:28 PM2024-03-21T18:28:10+5:302024-03-21T18:28:20+5:30
एक दिवस एक वसाहत: आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा, टँकर व जारच्या पाण्यावर भागवावी लागते तहान
छत्रपती संभाजीनगर : अधिकारी, उद्योजक व सधन वसाहती मानल्या गेलेल्या सिडको एन-२, एन-३, एन-४ देखील समस्या मुक्त नाहीत. रस्ते गुळगुळीत दिसत असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिका आठ दिवसातून एकदा पाणी देते अन् पाणीपट्टी एक महिन्याची वसूल करते. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव टँकर व जारच्या पाण्यावर अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो आहे.
नियोजनाचा बोलबाला असलेल्या या वसाहतीमध्ये नियोजनाचा झालेला बभ्रा नागरिकांना गांजणाऱ्या समस्यावरून दिसतो. अनेक ठिकाणी ड्रेनेज व जलवाहिन्या एकमेकांना क्रॉस झाल्यात. दोन्हीपैकी कुठलीही वाहिनी लिकेज झाली की, नागरिकांना दूषित पाण्याचा रतीब टाकला जातो. गेल्या वर्षीपासून या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. पण ते वेळेत काही पूर्ण होत नाही. या खोदकामातून निघालेला मुरूम चक्क येथून उचलून विकून टाकण्यात आला. हे खड्डे भरण्यासाठी माती आणून टाकली. आता ही माती दबून पुन्हा तेथे खड्डे झाले आहेत. ते कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या खड्ड्यातून सांडपाणी मुरून जलवाहिनीद्वारे नळास येते.
या वसाहतीत घंटागाडीची फेरीही दोन दिवसाआड होते. त्यामुळे दोन-तीन दिवस कचरा घरात साठवून ठेवावा लागतो. अनेकदा या कचऱ्यामुळे घरातही दुर्गंधी पसरते. हिरवाईने नटलेल्या या वसाहतीमध्ये झाडांचा पालापाचोळाही मोठ्या प्रमाणात निघतो. त्यामुळे घंटागाड्यांनी या वसाहतीत दररोज फेरी मारून कचरा गोळावा करावा, अशी मागणी महिला व नागरिकांकडून होत आहे.
समान पाणी का वाटप नाही...
नागरिक रांगेत उभे राहून कर मनपाकडे अदा करतात. मग सिडको एन-२ , ३, ४ परिसराला पुरेसे पाणी दिले जात नाही. ४५ मिनीट पाणीपुरवठा केला जातो. त्यात दूषित पाणी आले तर निर्जळीच होते.
- राहुल इंगळे
काळी माती आली कशी?
मंदिराजवळून जलवाहिनी टाकण्यासाठी नवीनच सिमेंट रोड खोदण्यात आला. जलवाहिनी टाकली तीही ड्रेनेज लाइनला क्राॅस करून. येथील मुरूम गायब झाला व आता काळी माती टाकून बुजविणे सुरू आहे. कामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
- मनोज बोरा
घंटा गाडी दररोज हवी...
दररोज घरापर्यंत जाऊन कचरा उचलण्याची जबाबदारी दिलेली असताना दोन दिवसाआड घंटा गाडी पाठविली जाते. आमच्यावर जास्त लोड असल्याने दररोज येत नाही, असे सांगून कचरा गाडीवाले तिसऱ्या दिवशी फेरी मारतात. वर्गीकरण केलेल्या कचऱ्याच्या बकेट सांभाळून ठेवाव्या लागतात.
- संध्या नारखेडे
जलबेल ॲप पारदर्शक नाही...
३० मिनिटे अगोदर पाण्याचा संदेश पाठविला जातो तो संदेश आल्यापासून वाळूजला असलेला व्यक्ती धडपड करीत घरापर्यंत पोहोचतो. पाण्यासाठी एक व्यक्ती दिवसभर घरीच थांबवावा लागतो. कधी जलवाहिनी फुटली तर कधी पाणी पुरवठ्यास उशीर अशा प्रकाराने नागरिक वैतागले आहेत. - मयुरी व्यवहारे
रस्त्यावर अडथळे अधिक...
मुलांना शाळेत जातांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिसरातून वाहने सुसाट चालविले जातात. यामुळे किरकोळ अपघात होतात. कामगार चौकात वाहतूक पोलिस कायम असावा म्हणजे वाहतूक कोंडी होणार नाही.
- अर्चना पाटणी