उच्चभ्रूंची वसाहत संग्रामनगरचा अजूनही संपला नाही संग्राम, अजूनही टँकरच्या चकरा सुरूच
By साहेबराव हिवराळे | Published: July 4, 2023 02:35 PM2023-07-04T14:35:20+5:302023-07-04T14:36:13+5:30
एक दिवस एक वसाहत: ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे.
छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील संग्रामनगर ही बँकर, शिक्षक, डॉक्टर, वकील, व्यावसायिक, उद्योजक, शैक्षणिक संस्थांच्या टोलेजंग इमारती व घर, बंगले असलेली वसाहत आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या काळापासून येथे पाण्याची टंचाई उन्हाळ्यात सहन करावी लागते तर पावसाळ्यात ‘घर पाण्याच्या वेढ्यात’ अशी विचित्र अवस्था आहे. आता काही रस्ते तयार आहेत तर अंतर्गत रस्त्यावर साधे खडीकरणही न केल्याने पावसाळ्यात चिखलातूनच वाट काढावी लागते.
नुकतेच संग्रामनगराच्या चोहोबाजूंची रस्ते सिमेंटीकरणाने बांधण्यात आल्याने रस्ते गुळगुळीत झाले असले तरी अंतर्गंत रस्त्यावर पाण्याचे लोंढे कायम वाहत असतात. अनेकांच्या घरासमोर पाणी तुंबल्याने त्यातून वाट काढत मुख्य रस्त्यावर जावे लागते. स्कूलबसचालक घरापर्यंत येण्यास नकार देतात. त्यामुळे त्रास पालकांना सहन करावा लागतो.
रस्त्यावरील कामे अपूर्णच...
संग्रामनगरातील नागरिकांना पुलाखालून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील कामे अपूर्ण असून, रस्त्यावर देखील दुभाजकांचे काम पूर्ण नसल्याने रात्री वाहनधारकांना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. दिशादर्शक चिन्ह नसल्याने अपघात होत आहेत.
- रोहन पवार (रहिवासी)
मंजूर कामांना गती द्यावी...
महानगरपालिकेत वॉर्डासाठी मंजूर केलेल्या कामाला मनपाने गती देण्याची गरज असून, ड्रेनेज व जलवाहिनी टाकल्यानंतरच रस्ते तयार करावेत, अन्यथा केवळ रस्ते खोदून ठेवू नयेत. खराब पथदिवे बदलण्याची गरज आहे.
- माजी नगरसेविका सायली जमादार
अपघाताची भीती वाटते
रेणुकामाता कमान रस्त्यावर गतिरोधक हवेत या रस्त्यावरून वाहने सुसाट वेगाने पळविली जातात. मनपाने महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना व नागरिकांना अपघाताची भीती वाटते.
- सय्यद याकूब (रहिवासी)
अजूनही टँकरवरच मदार...
शहरातील घरं विकून सातारा परिसरात नागरिकांनी घर घेतले तर काहींनी स्वत: टोलेजंग बंगलेही उभारले. परंतु घरात पाण्याचा थेंब येत नाही. अनेक वर्षांपासून टँकर आणि जारच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.
- अमोल सर्जे, रहिवासी
ड्रेनेज चोकअपचा त्रास थांबवा...
नवीन ड्रेनेजलाईन काही परिसरात टाकली तर काही ठिकाणी आजही जुन्याच लाईन वापरल्या जात आहेत. त्यांची क्षमता कमी असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर चोकअप होऊन सांडपाण्याचे डबके साचते अनेकांना त्यातूनच मार्ग काढावा लागतो. मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- गणेश पवार, रहिवासी