रंगात रंगली तरूणाई
By Admin | Published: March 18, 2017 12:02 AM2017-03-18T00:02:03+5:302017-03-18T00:02:28+5:30
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ गतवर्षी जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट होते़ त्यामुळे रंगपंचमीचा उत्साह कमी होता़ यंदा मात्र तरूणाई रंगात न्हाऊन निघाली़ तरूणाईसह आबालवृद्धांनीही रंग खेळला़ विशेष म्हणजे यंदा नैसर्गिक रंगाचा वापर झाला़ केमिकलयुक्त रंग, वार्निस व काचेचे कलर न वापरता तरूणाईने नैसर्गिक रंगाचा उधळण करून जल्लोष साजरा केला़ शहरातील चौका-चौकात डॉल्बीच्या तालावर नृत्यांची धमाल करीत तरुणाई दिवसभर रंगात चिंब रंगली़ चौका-चौकात आणि रस्त्या-रस्त्यांवर तरुणाईच्या जथ्यांनी एकमेकांवर रंगाची मुक्त उधळण केली.
भारतीय संस्कृतीनुसार रंगपंचमीचा सण फाल्गुन मासात येतो. याच कालावधीत वसंत ऋतूचे आगमन होत असल्याने या सणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे रंगपंचमीचा उत्साह काही औरच होता. गेल्या तीन वर्षांपासून रंगपंचमीसह इतर सणांना दुष्काळाची किनार होती. त्यामुळे कोरड्या रंगांची उधळण करण्यावर नागरिकांचा भर होता. मात्र, यंदा समाधानकारक आणि मुबलक पाऊस झाल्यामुळे गेल्या चार वर्षांच्या खंडानंतर तरुणाई रंगात चिंब चिंब न्हाऊन निघाली आहे.
रंगपंचमीनिमित्त चौका-चौकात रंगाचे पिप भरुन तरुणाई ओलीचिंब झाली. लातुरात गावभागातील सेंट्रल हनुमान, खडक हनुमान, सिध्देश्वर वेस, पटेल चौक, पोचम्मा गल्ली, हत्तेनगर, सुभाष चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, मिनी मार्केट, शिवनगर, प्रकाश नगर, आदर्श कॉलनी, शिवाजी चौक, गांधी चौक, विवेकानंद चौक, शाहू चौक, नांदेड नाका, मळवटी रोड, बार्शी रोडवरील पाण्याची टाकी, औसा रोडवरील खर्डेकर स्टॉप, संभाजी नगर, खाडगाव रोड, अंबाजोगाई रोडवरील अहिल्यादेवी होळकर, चौक, जुना रेणापूर नाका परिसर, उद्योग भवन परिसर, ठाकरे चौक, कॉईल नगर, कोल्हे नगर, मोतीनगर, कोकाटे नगर, मंत्री नगर, एलआयसी कॉलनी, जुना औसा रोड, विशाल नगर, श्रीनगर, बालाजी नगर, राजीव नगर, इंदिरा नगर, म्हाडा कॉलनी, माताजी नगर, बसवेश्वर चौक, पटेल नगर, कन्हेरी नाका, सुपारी हनुमान, गांधी नगर, बोधे नगर आदीं परिसरात तरुणाईने एकत्र येऊन रंगांची उधळण केली. शाळांनीही रंगपंचमी साजरी केली़