विसर्जन विहिरीची स्वच्छतेसह रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:15 PM2018-11-11T22:15:43+5:302018-11-11T22:15:56+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरात स्वच्छतेसाठी शिक्षक दाम्पत्याने पुढाकार घेतला असून, पाच सोसायटीतील महिला व नागरिकांच्या मदतीने श्री विसर्जन विहिरीची स्वच्छता करुन रंगरगोटी करण्यात आली आहे.
पाच सोसायटींची मदत : स्वच्छतेसाठी शिक्षक दाम्पत्याचा पुढाकार
वाळूज महानगर : बजाजनगरात स्वच्छतेसाठी शिक्षक दाम्पत्याने पुढाकार घेतला असून, पाच सोसायटीतील महिला व नागरिकांच्या मदतीने श्री विसर्जन विहिरीची स्वच्छता करुन रंगरगोटी करण्यात आली आहे.
बजाजनगरच्या एमआयडीसी कर्मचारी वसाहतीजवळील कपिलधारा सोसायटीलगत श्री विसर्जन विहिर आहेत. या विहिरीत दरवर्षी परिसरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येते. एमआयडीसीकडून गणेशोत्सवाच्या प्रारंभी व विसर्जन झाल्यानंतर या विहिरीची स्वच्छता केली जाते. यंदा गणेशोत्सवाच्या सुरवातीला या विहिरीची साफ-सफाई करण्यात आली होती.
मात्र विसर्जनानंतर विहिरीची स्वच्छता न केल्याने ही विहीर कचऱ्याने भरली होती.त्यामुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास सुरु झाला. सोसायटीतील नागरिकांनी एमआयडीसीकडे स्वच्छतेसाठी पाठपुरावा केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने वास्तव्यास आलेल्या बळीराम वळसंगे व जयदेवी वळसंगे या शिक्षक दाम्पत्याने पुढाकार घेत विहीर व परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमाला ग्रामविकास अधिकारी सविता हत्ते यांनीही प्रोत्साहन देत कल्पना व्यवहारे, अलका दुग्गडल सत्यशिला सोळंके, लक्ष्मी नागरे, सुरेखा पायगव्हाण,प्रभा पेठकर, लता दिवटे, विजया साध्ये, मंगल वळसंगे आदींनी मदतीने स्वच्छता अभियान राबविले.
वर्गणी करुन विहिरीची स्वच्छता व रंगरंगोटी
पाच सोसायटींतील नागरिकांनी प्रत्येकी २०० रुपये लोकवर्गणी ३ हजार रुपये जमवून या विहिरीची स्वच्छता केली. यानंतर सोसायटीतील महिलांनी श्रमदान करुन परिसर स्वच्छ केला. यानंतर विसर्जन विहिरीची रंगरंगोटी करुन या ठिकाणी स्वच्छतेची जनजागृती करणारे फलक लावले आहेत. याच बरोबर विहिरीत कचरा टाकणाºयाकडून दंड वसूल करण्याचा निर्णयही सोसायटीतील नागरिकांनी केला आहे.
स्वच्छतादूत बनून जनजागृती
बजाजनगरात या शिक्षक दाम्पंत्याच्यावतीने स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. या पाच सोसायटीतील नागरिक व महिला स्वच्छता दूत दररोज एकत्र येऊन परिसराची स्वच्छता करुन कचºयाची विल्हेवाट लावतात. या उपक्रमाला हळुहळु चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.