आओ जाओ घर तुम्हारा ! जिल्हा सीमांवर तपासणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:02 AM2021-03-19T04:02:07+5:302021-03-19T04:02:07+5:30
रुग्णसंख्या वाढीला हातभार : एकाच रेल्वेतील प्रवाशांची तपासणी, एसटी प्रवासी स्वत:हून आला तरच तपासणी औरंगाबाद : रेल्वेस्टेशन, बसस्थानक आणि ...
रुग्णसंख्या वाढीला हातभार : एकाच रेल्वेतील प्रवाशांची तपासणी, एसटी प्रवासी स्वत:हून आला तरच तपासणी
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन, बसस्थानक आणि जिल्हा सीमांची अवस्था आजघडीला ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच आहे. कारण जिल्हा सीमांवर अन्य जिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणीच होत नाही. स्टेशनवर १७ पैकी केवळ एका रेल्वेतील प्रवाशांची तपासणी केली जाते, तर एसटी प्रवासी स्वत:हून आला तरच तपासणी अशी अवस्था मध्यवर्ती बसस्थानकात आहे. या सगळ्यातून रुग्णसंख्या वाढीला हातभार लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, दररोज एक हजारांवर नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती नाशिक आणि कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागांतून येणाऱ्या प्रवाशांकडे साफ दुर्लक्ष होत आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शहर, जिल्हा सीमांवर कोरोना तपासणी केल्यानंतरच अन्य जिल्ह्यांतील वाहनांना प्रवेश दिला जात होता. परंतु सध्या अशी कोणतीही तपासणी होताना दिसत नाही. शहरात कोणत्या जिल्ह्यातील नागरिक येत आहे, याची कोणतीही नोंद होताना दिसत नाही.
-----
बहुतांश प्रवासी तपासणीपासून दूरच
१) बसस्थानकात महापालिकेचे पथक तैनात आहे. परंतु प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात नाही. ज्या प्रवाशांना तपासणी करावी वाटली, असेच प्रवासी स्वत:हून तपासणी करतात.
२) मुंबईला कर्तव्य बजावून आलेले एसटीचालक, वाहक कोरोना तपासणी करून घेण्यास प्राधान्य देतात. परंतु बहुतांश प्रवासी तपासणीपासून दूरच राहतात.
३) कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या जिल्ह्यांतून येणाऱ्या बसमधील प्रवाशांची तपासणी होत नाही. त्यामुळे अशा बसमधून कोरोनाबाधित प्रवासी शहरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
------
इतर रेल्वेतील प्रवाशांची तपासणी व्हावी
१) दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसमधील प्रवाशांची कोरोना तपासणी सुरू करण्यात आली. या एकमेव रेल्वेतील प्रवाशांची तपासणी केली जाते.
२) सध्या १७ रेल्वेंची ये-जा होते. यात नऊ रेल्वे रोज ये-जा करतात. पण केवळ एकाच रेल्वेतील प्रवाशांची कोरोना तपासणी होते. इतर रेल्वेतील प्रवाशांतून कोरोना पसरत नाही का, असा सवाल सचखंड एक्स्प्रेसचे प्रवाशांनी उपस्थित केला.
३)मनमाडला जाणारी मराठवाडा एक्स्प्रेस आणि नांदेडला जाणारी सचखंड एक्स्प्रेस एकाच वेळी येते. अशावेळी कोरोना तपासणीसाठी सचखंड एक्स्प्रेसच्या प्रवाशांना शोधण्याची कसरत रेल्वे कर्मचाऱ्यांना करावी लागते.
-----------
पथक तैनात केलेले नाही
१) पुणे-नगर-औरंगाबाद या मार्गाने दररोज हजारो प्रवासी औरंगाबादेत दाखल होतात. या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची पूर्वी कोरोना चाचणी केली जात असे. परंतु आजघडीला या मार्गावर कोणतेही पथक तैनात करण्यात आलेले नाही.
२) नगररोडसह अजिंठा रोड, हर्सूल टी पाॅइंट, जालना, सोलापूर, बीडकडून येणाऱ्यांची केंब्रिज चौक, बीड बायपासवरील चौकात तपासणी करण्याची गरज आहे. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून याकडे दुर्लक्ष होताना दिसत नाही.
३) शहरात प्रवेश करता येणाऱ्या इतर छोट्या मार्गाकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे. तपासणी टाळण्यासाठी अशा छोट्या मार्गाने लपूनछपून प्रवेश करण्यास सर्रास प्राधान्य दिला जातो.
------
सर्व चेकपोस्टवर शनिवारपासून तपासणी होणार आहे. शहरात सहा चेकपोस्ट आहेत. नगरनाका, छावणी, बीड आणि जालना रोड, अजिंठा रोड येथे तपासणी होणार आहे.
-डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा