‘पोरा बंदूक घेऊन बाहेर ये रे...’; आजीबाईच्या हुशारीने शेतवस्तीवर आलेले चोरटे पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 07:17 PM2018-06-21T19:17:48+5:302018-06-21T19:18:56+5:30
शेतवस्तीवर आलेल्या चोरट्यांना पळवून लावण्यासाठी आजीबाईने आरडा-ओरडा करीत मुलाला बंदूक घेऊन घराबाहेर येण्याची शाब्दिक युक्ती वापरली.
औरंगाबाद : शेतवस्तीवर आलेल्या चोरट्यांना पळवून लावण्यासाठी आजीबाईने आरडा-ओरडा करीत मुलाला बंदूक घेऊन घराबाहेर येण्याची शाब्दिक युक्ती वापरली. यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी पळ काढल्याची घटना मंगळवारी रात्री वाळूजला शेतवस्तीवर घडली.
गंगापूर साखर कारखान्याचे माजी संचालक तथा माजी उपसरपंच उदय पा. चव्हाण हे कुटुंबियांसह वाळूजलगत शेतवस्तीवर राहतात. मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर उदय चव्हाण हे वरच्या मजल्यावर, तर मुलगा शुभम हा आजी शांताबाई यांच्या सोबत तळमजल्यावर झोपला होता. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या शेतवस्तीवर येऊन घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून बंद दरवाजा उघडत नसल्याने चोरट्यांनी तो लाथा मारून उघडण्याचा प्रयत्न केला.
आवाजामुळे गाढ झोपेत असलेल्या शांताबाई चव्हाण यांना जाग आली. शांताबाई यांनी नातू शुभम यास झोपेतून उठविले व मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. या आवाजामुळे वरच्या मजल्यावर असलेल्या उदय चव्हाण व त्यांच्या पत्नीला जाग झाली. मात्र, चोरट्यांच्या भीतीमुळे उदय चव्हाण यांनी दरवाजा उघडला नाही. चोर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे शांताबाई यांनी मोठ्याने ओरडून, ‘चोर आलेत... तू बंदूक घेऊन घराबाहेर ये’, असे मुलगा उदय चव्हाण यास उद्देशून ओरडून सांगितले. या शेतमालकाकडे बंदूक असल्याचे लक्षात येताच जीव वाचविण्याच्या प्रयत्नात चोरटे तेथून पसार झाले. मात्र, चोरटे कुठेतरी आडोशाला लपून बसले असण्याच्या शक्यतेमुळे चव्हाण कुटुंबियांनी घराबाहेर पडण्याचे टाळले.
पोलीस पोहोचले; परंतु चोर नाही दिसले
चोर मारहाण करतील या भीतीमुळे उदय चव्हाण यांनी वाळूज पोलीस ठाण्यातील दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस ठाण्याचा फोन लागत नसल्यामुळे चव्हाण यांनी १०० नंबरवर संपर्क साधून माहिती दिली. यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाकडून ही माहिती वाळूज पोलिसांना देण्यात आली. सहायक फौजदार दत्तात्रय साठे यांनी पोलीस कर्मचारी व एसपीओंना सोबत घेऊन रात्री १.३० वाजेच्या सुमारास चव्हाण यांची शेतवस्ती गाठली. पोलीस पथकाने या शेतवस्तीवर जाऊन मदतीसाठी आल्याचे सांगताच घाबरलेले चव्हाण कुटुंबीय घराबाहेर पडले. पोलीस पथकाने हा परिसर पिंजून काढत चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. चव्हाण कुटुंबियांना काळजी घेण्याचा सल्ला देत पोलीस माघारी परतले.