सुरतहून यायचे, चोरी करून जायचे
By Admin | Published: March 1, 2016 12:26 AM2016-03-01T00:26:31+5:302016-03-01T00:50:13+5:30
औरंगाबाद : गर्दीच्या ठिकाणी सावज हेरून ठेवायचे... टोळीतील बालकांनी त्याला घेराव घालायचा... समोरून असलेल्या एकाने त्याला काही तरी बोलण्यात गुंतवून ठेवायचे
औरंगाबाद : गर्दीच्या ठिकाणी सावज हेरून ठेवायचे... टोळीतील बालकांनी त्याला घेराव घालायचा... समोरून असलेल्या एकाने त्याला काही तरी बोलण्यात गुंतवून ठेवायचे आणि पाठीमागून दुसऱ्या बालकाने खिशातील मोबाईल लंपास करायचा, अशी पद्धत वापरून मोबाईल चोरीसाठी आठवडी बाजार करणारी ही कुख्यात टोळी क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी रात्री खोकडपुरा (सामाजिक न्याय भवन परिसर) भागातून जेरबंद केली. आठ जणांच्या या टोळीत चार अल्पवयीन मुले आहेत.
अनिल महत्तो, सोनू रामजीवन महत्तो, शेख जुबेर शेख वरसल्ली, विजय विनोद महत्तो (सर्व रा. महाराजपूर, जि. साहबगंज, झारखंड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना सोमवारी न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी या टोळीकडून दोन हजार २८० रुपयांची रोकड, ७२ हजार रुपयांचे ११ मोबाईल, दोन चाकू, मिरचीपूड आणि दोरी असे साहित्य जप्त केले आहे. सर्व चोरटे हे अशिक्षित आहेत, अशी माहिती तपास अधिकारी फौजदार संजय अहिरे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मूळ झारखंड राज्यातील असलेल्या या टोळीचा मुक्काम सुरतला असतो. ते प्रत्येक शनिवारी रात्री सुरतहून निघायचे, रविवारी सकाळी शहरात उतरल्यावर दुपारपर्यंत बसस्थानकात फिरायचे. तेथून ते रविवार बाजार, जाधववाडी, भाजीमंडई इ. गर्दीची ठिकाणे ‘टार्गेट’ करून मोबाईल, पाकिटांची चोरी करायचे.
विशेष म्हणजे ही टोळी काम फत्ते झाले की लगेच शहर सोडायची. त्यामुळे पोलिसांना या टोळीबाबत माहिती नव्हती.