लसीकरणासाठी या आणि कोरोना घेऊन जा ! एकाच केंद्रात दोन्ही सुविधेने धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 06:15 PM2021-03-24T18:15:59+5:302021-03-24T18:16:41+5:30

एन-८, आरोग्य वर्धिनी केंद्र येथे लसीकरण आणि कोरोना चाचणी एकाच ठिकाणी

Come for vaccination and take Corona! | लसीकरणासाठी या आणि कोरोना घेऊन जा ! एकाच केंद्रात दोन्ही सुविधेने धोका वाढला

लसीकरणासाठी या आणि कोरोना घेऊन जा ! एकाच केंद्रात दोन्ही सुविधेने धोका वाढला

googlenewsNext
ठळक मुद्देलसीकरण आणि कोरोना चाचणी एकाच ठिकाणी

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी या आणि सोबत कोरोना घेऊन जा, अशीच काहीशी अवस्था सिडको एन-८ येथील आरोग्य वर्धिनी केंद्राची झाली आहे. कारण लसीकरण आणि कोरोना चाचणी या दोन्ही बाबी या केंद्रावर होत आहे. मुख्य प्रवेशद्वारातून लसीकरणासाठी आणि चाचणीसाठी येणाऱ्यांची एकत्रितपणे ये-जा हाेते. शिवाय लसीकरणाच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या २० पावलांच्या अंतरावर चाचणीसाठी स्वॅब घेण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

एन-८ येथील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या इमारतीबाहेर टेबल टाकून कोरोना संशयित रुग्णांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्यात येतात, तर केंद्राच्या आतमध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, व्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाते. लसीकरणासाठी आणि कोरोना चाचणीसाठी येणारे मुख्य प्रवेशद्वारातून ये-जा करतात. स्वॅब दिल्यानंतर अनेकजण थेट इमारतीच्या आतमध्ये जाऊन डाक्टर, परिचारिका यांना होणाऱ्या त्रासाविषयी माहिती देतात, कुठे ॲडमिट होता येईल का, औषधी मिळेल का, होम आयसोलेशनमध्ये थांबला येईल का, आरटीपीसीआरचा अहवाल कधी मिळेल, अशा अनेक बाबींची चारणा करतात. म्हणजे लसीकरणासाठी आलेले आणि चाचणीसाठी आलेले नागरिक एकमेकांत मिसळत आहे. परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याची स्थिती आहे. यातून लसीकरणासाठी आलेले, ज्येष्ठांसोबत आलेल्या घरातील व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही.

अवघ्या २० पावलांचे अंतर
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी ज्या प्रवेशद्वारातून नागरिक केंद्रात जातात, तेथून अवघ्या २० पावलांच्या अंतरावर कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात येत आहे. केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारातून कोरोना चाचणीसाठी आणि लसीकरणासाठी येणाऱ्यांची एकत्रच ये-जा हाेत आहे. पण किमान नागरिकांची ये-जा वेगवेगळ्या मार्गाने होईल, याचे कोणतेही नियोजन केलेले नाही.

दररोज १५० कोरोना चाचण्या
या केंद्रांवर दररोज १५० नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहे. त्यात रोज अनेकांचा अहवाल सकारात्मक येतो. त्यामुळे लसीकरण आणि कोरोना चाचणी एकाच ठिकाणी असता कामा नये, अशी अपेक्षा लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

जागेचा शोध
लसीकरण हे केंद्राच्या आतमध्ये केले जाते. तर कोरोना चाचणी केंद्राबाहेरील आवारात केली जात आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना सकाळी बोलावले जाते, तर दुपारनंतर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जाते. कोरोना चाचणी दुसरीकडे करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जागेचा शोधली जात आहे.
- डाॅ. बुशरा सिमी, केंद्रप्रमुख, आरोग्य वर्धिनी केंद्र, एन-८

Web Title: Come for vaccination and take Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.