प्रवाशांना थोडा दिलासा ! संपाच्या ४५ व्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांतून धावली एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 12:34 PM2021-12-24T12:34:35+5:302021-12-24T12:37:01+5:30
ST Strike : दिवसभरात २२१ फेऱ्या : साडेतीन हजार प्रवाशांनी केला प्रवास
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या (ST Strike ) ४५ व्या दिवशी गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांतून एसटी धावली. दिवसभरात ८४ ‘एसटी’च्या २२१ फेऱ्या झाल्या (ST Bus ran through all the bus stands in the Aurangabad district) . यातून साडेतीन हजार प्रवाशांनी प्रवास केला.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी अजूनही अनेक कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाहीत. दुसरीकडे संघटनेने संप मिटल्याची घोषणा केल्यानंतर कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले. परिणामी, एसटीची सेवाही सुरळीत होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात बुधवारी ६४२ एसटी कर्मचारी कामावर हजर होते. ही संख्या गुरुवारी ६८३ वर पोहोचली.
सिडको बसस्थानकातून जालना मार्गावर १० लाल परीने २६ फेऱ्या केल्या. यातून ६०९ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद - बीड मार्गावर १२ बसच्या १८ फेऱ्यातून ३४३ प्रवाशांनी प्रवास केला. मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे मार्गावर धावलेल्या १५ शिवशाही बसमधून ४८० प्रवाशांनी प्रवास केला. नाशिक मार्गावर ६ शिवशाहीने १२ फेऱ्या केल्या. औरंगाबाद - कन्नड मार्गावर ३ बसने ६ फेऱ्या केल्या, त्यात ९८ प्रवासी मिळाले. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ४ बसने ८ फेऱ्या केल्या. बुलडाणा, जळगाव मार्गावर प्रत्येकी दोन तर पैठण, धुळे मार्गावर प्रत्येकी एक बस चालविण्यात आली. यासह जिल्ह्यातील अन्य सहा आगारांतूनही बसगाड्या धावल्या.
आजपासून कारवाईची शक्यता
जे कर्मचारी कामावर परतणार नाही, अशांवर शुक्रवारपासून बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे एसटी शासनात विलीन करण्याच्या मागणीसंदर्भात ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आम्ही आमचा दुखवटा कायम ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांतर्फे सांगण्यात आले.