दिलासा! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे वावटळ महिनाभरातच शांत;नव्या रुग्णांची संख्या शंभराखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 01:02 PM2022-02-08T13:02:59+5:302022-02-08T13:03:25+5:30
जानेवारीअखेरीस रुग्णसंख्येचा आलेख घसरत गेला आणि आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला.
औरंगाबाद : नव्या वर्षाच्या प्रारंभीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेसह सर्वसामान्यांना धडकी भरवली मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचे वावटळ अवघ्या महिनाभरात शांत झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरानंतर सोमवारी नव्या रुग्णांची संख्या शंभराखाली आली. दिवसभरात अवघ्या ८४ रुग्णांची वाढ झाली. उपचार सुरू असताना ५ रुग्णांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तिसऱ्या लाटेने डोके वर काढले. पाहता पाहता रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. जिल्ह्यात ३ जानेवारी रोजी ३७ रुग्णांची भर पडली होती. दुसऱ्यादिवशी ४ जानेवारी रोजी १०३ रुग्णांचे निदान झाले. त्यानंतर रोज ही संख्या वाढतच गेली. जिल्ह्यात २४ तासांत निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजारांवर गेली. मात्र, जानेवारीअखेरीस रुग्णसंख्येचा आलेख घसरत गेला आणि आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला. अवघ्या महिनाभरातच तिसऱ्या लाटेचा जोर ओसरला.
जिल्ह्यात सोमवारी निदान झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ७२ आणि ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील १९० आणि ग्रामीण भागातील १४८ रुग्णांना सुटी देण्यात आली. ३ हजार ५०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मृत्यूसंख्या चिंताजनक...
उपचार सुरू असताना कन्नड तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुष, गंगापूर तालुक्यातील दहेगाव येथील ४१ वर्षीय पुरुष, औरंगाबादेतील एस. बी. काॅलनीतील ७३ वर्षीय पुरुष, दशमेशनगर येथील ८९ वर्षीय पुरुष, इटखेडा येथील ८६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. नवे रुग्ण कमी होत असले, तरी वाढत्या मृत्यूने चिंता व्यक्त होत आहे.
मनपा हद्दीतील रुग्ण
पुंडलिकनगर १, नरहरीनगर १, जय भवानीनगर ३, उस्मानपुरा १, प्रतापनगर १, उल्कानगरी १, संत तुकोबानगर १, पैठण गेट १, भगतसिंगनगर १, मयूर पार्क १, होनाजीनगर १, अन्य ५९
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद तालुका ४, गंगापूर ३, सिल्लोड २, वैजापूर ३