दिलासादायक ! १०८ रुग्णवाहिकेने ८ महिन्यांत १५ हजार रुग्णांचे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 02:12 PM2020-12-16T14:12:10+5:302020-12-16T14:13:54+5:30
जिल्ह्यात ३१ रुग्णवाहिका आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यातील १०८ रुग्णवाहिकांनी गेल्या ८ महिन्यांत वेळेत रुग्णालयांत पोहोचून तब्बल १५ हजार ८३५ रुग्णांचे प्राण वाचविले. यात ८ हजार ५९९ कोरोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे. रुग्णसेवेसाठी रात्रंदिवस या रुग्णवाहिका धावत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गंत राज्यस्तरीय नियुक्त सेवा पुरवठादार भारत विकास ग्रुप व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात ३१ रुग्णवाहिका आहेत. तर यातील चालक व डॉक्टरांची संख्या १२८ आहे. आजार, अपघातासह कोणतीही आपत्कालीन स्थिती, अडचण असेल तर पहिला फोन हा १०८ रुग्णवाहिकेला केला जातो. फोन आल्यानंतर काही मिनिटांत ही रुग्णवाहिका मदतीसाठी दाखल होते. गर्भवती माता, अपघातग्रस्त रुग्णांना याचा फायदा होतो. यासाठी रुग्णवाहिकेचे चालक, डॉक्टर महत्वाची भूमिका निभावत आहेत. कोरोना काळात रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका मिळेल, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक ओमकुमार कोरडे, डॉ. गौरव शेळके, डॉ. अतुल मुरुगकर यांनी यासाठी प्रयत्न केले.
कोरोनाग्रस्तांसाठी धावल्या १४ रुग्णवाहिका
कोरोना रुग्णांना रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी १४ रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन होते. तेव्हा सर्व वाहतूक बंद होती. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांना घरी पोहोचविण्यासाठीही या रुग्णवाहिकांनी महत्वाची भूमिका निभावली.
अपघातातील रुग्णांना वेळीच मदत
कोरोना रुग्णांना सेवा देण्यासह अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका धावल्या. कोरोनाच्या गेल्या ८ महिन्यांत ४८ गर्भवती महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. प्रसूतीनंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सहा वर्षांपासून सेवा
औरंगाबाद जिल्ह्यात २०१४ पासून १०८ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. आतापर्यंत २ लाख ८५ हजार रुग्णांना वेळेत रुग्णालयांत पोहोचविण्यात आले. कोविड काळात रुग्णसंख्या वाढली होती. या सगळ्यात सेवा सुरळीत राहिली.
- ओमकुमार कोरडे, समन्वयक, ईएमएस