दिलासादायक ! अतिवृष्टीमुळे नादुरुस्त रस्ते, पुलांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ टक्के निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:25 PM2020-12-25T17:25:41+5:302020-12-25T17:47:36+5:30
राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या ५ टक्के निधी विशेष बाब म्हणून तातडीच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे ९०८ किलोमीटर रस्ते व ४१० पूल आणि एक संरक्षक भिंत वाहून गेले आहेत. बुधवारी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या ५ टक्के निधी विशेष बाब म्हणून तातडीच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ते व पुलांच्या प्रलंबित दुरुस्तीचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहीती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जफर अहमद काझी यांनी दिली.
जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ६५५ किलोमीटरचे ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग आहेत. आधीच चाळणी झालेल्या रस्त्यांचा पावसाळ्यात काही भाग वाहून गेल्याने रस्त्यावर चालणेही अवघड बनले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले की, ४ सप्टेंबर २०१९ मध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड व सोयगाव या तालुक्यांतील ९९ पूल अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाले होते. त्यासाठी २७ कोटी ७६ लाख १० हजार रुपयांची मागणी ग्रामविकास विभागाकडे निधीची मागणी केली. तर जिल्ह्यातील यंदाच्या अतिवृष्टीमुळे ९०८ किलोमीटर रस्ते वाहून गेले. तर ४१० पूल व एक संरक्षक भिंत नादुरुस्त झाली. त्यासाठी १३४ कोटींची मागणी नोव्हेंबर मध्ये राज्य शासनाकडे केली.
गेल्या चार-पाच वर्षांपासून दुरुस्तीला निधी मिळत नव्हता. मात्र, राज्य शासनाने बुधवारी नियोजन विभागातर्फे जिल्हा नियोजनाच्या मंजूर निधीच्या १० टक्के रक्कम मुख्यमंत्री रस्ते विकास योजनेला तर विषेश बाब म्हणून ग्रामीण रस्ते दुरुस्तीला ५ टक्के निधी देण्याचा आदेश काढला आहे. आता निधी नेमका किती मिळतो याकडे बांधकाम विभागाचे लक्ष लागले आहे.