दिलासादायक ! औरंगाबादमध्ये गरिबांना रेमडेसिवीर २३६० रुपयांत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 07:46 PM2020-10-20T19:46:00+5:302020-10-20T19:49:15+5:30
खाजगी रुग्णालयातील देयकांवर नियंत्रण सक्तीने करण्याची सूचना
औरंगाबाद : जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, गरीब रुग्ण जे खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत त्यांना अन्न व औषधी प्रशासनामार्फत २३६० रुपयांत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना आढावा बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला खा. इम्तियाज जलील, खा. डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे यांच्यासह पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, एफडीएचे सहआयुक्त संजय काळे, घाटीचे डॉ. झिने, डॉ. नीता पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
बैठकीत खा. कराड, आ. सावे यांनी रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे सूचित केले. खा. जलील, आ. बागडे यांनी मास्क वापराबाबत तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन गरीब रुग्णांसाठी सवलतीत उपलब्ध होणार आहे, याबाबत जनजागृती करण्याचे सांगितले. आ. शिरसाट यांनी कोरोनातून बरे झालेल्यांना पुढील काळात काही त्रास जाणवत नाही ना, यासाठीचा पाठपुरावा करावा. तसेच खासगी रुग्णालयांमधून कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांवर तसेच देयकांवर नियंत्रण ठेवण्याचे सूचित केले. आ. दानवे यांनी सर्व एटीएम सेंटरचे निर्जंतुकीकरण करावे. तसेच मास्क वापराबाबत मनपा, पोलिसांनी कडक कारवाई करावी, जेणेकरून नागरिकांमध्ये मास्क वापराचे प्रमाण वाढेल, असे सूचित केले.
शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्याची मागणी
यावेळी जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्याबाबतचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य मिळण्यासाठी त्याचा अहवाल वेळेत शासनाला सादर करावा. तसेच विमा कंपन्यांनाही त्याबाबत वेळेत कळवावे, असे सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचित केले.