दिलासादायक ! नवीन पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के वाढीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:22 PM2021-02-18T14:22:55+5:302021-02-18T14:28:01+5:30
New Water Pipeline For Aurangabad महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला.
औरंगाबाद : नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत शहराला दिलासा देण्यासाठी पाणी पुरवठ्यात २० टक्के वाढ करता येऊ शकते का, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तज्ज्ञ अधिकारी यासंबंधीचा आराखडा तयार करून महापालिकेला सादर करणार असल्याची माहिती बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांच्याकडून प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. त्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजनेत ५३ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. त्यातील २५ टाक्या तातडीने उभारण्यात येणार असून, टाक्या उभ्या करण्यासाठी जागा निश्चित केलेली नाही. या टाक्यांसाठी जागेची तपासणी करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथक तयार केले आहे. यामध्ये शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि प्रभाग अभियंता यांचा समावेश आहे. सध्या महापालिका ६० टक्के पाणीपुरवठा थेट टाक्यांवरून न करता, पाईपलाईनमधून करत आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे उपस्थित होते.
पाणी वाढविणे शक्य
जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत महापालिकेच्या जलवाहिन्या काही ठिकाणी अत्यंत कमकुवत झाल्या आहेत. या कमकुवत जलवाहिनीच्या बाजूने आणखी एक जलवाहिनी टाकून बायपास पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल. या प्रक्रियेमुळे शहरात २० टक्के पाण्याची वाढ होऊ शकते, असा प्रस्ताव अजय सिंग यांनी महापालिकेला दिला. यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक लवकरच प्राधिकरणकडून सादर करण्यात येईल.
सौर विजेचा वापर
सध्या महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाचा खर्च ५० ते ६० कोटी रुपये होत आहे. नवीन पाणीपुरवठा योजना आल्यानंतर हा खर्च किमान १२० ते १२५ कोटींपर्यंत जाईल. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर दहा हेक्टर जागा वन विभागाकडून घेऊन सौर पॅनलचा प्रकल्प उभारण्याबाबतचा विचारही आजच्या बैठकीत करण्यात आला.