दिलासादायक ! पासपोर्ट कार्यालये ८ महिन्यांनंतर सुरू; मराठवाड्यातील नागरिकांची गैरसोय थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:58 PM2020-12-02T17:58:13+5:302020-12-02T18:00:51+5:30
पासपोर्ट घेण्यासाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयातून संबंधितांना ‘ऑनलाईन अपॉइंटमेंट’ दिली जाते.
- प्रभुदास पाटोळे
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर २३ मार्चपासून बंद असलेले औरंगाबाद येथील पासपोर्ट कार्यालय तब्बल ८ महिन्यानंतर १ डिसेंबरपासून अखेर सुरू झाले. त्यासोबतच हिंगोली वगळता मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांसह जळगाव ,भुसावळ आणि धुळे येथील पासपोर्ट कार्यालये अशी १० कार्यालयेसुद्धा आजपासून सुरु झाली आहेत.
सिनियर पासपोर्ट असिस्टंट इलाही तांबोळी यांच्यासह औरंगाबाद येथील टपाल खात्याचे ३ कर्मचारी मंगळवारपासून औरंगाबादेत रुजू झाले. पासपोर्ट घेण्यासाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयातून संबंधितांना ‘’ऑनलाईन अपॉइंटमेंट’’ दिली जाते. १ डिसेंबर रोजी १० व्यक्तींना ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाली आहे. यापैकी अनामिका बाबुराव कांबळे (रा. न्यू श्रेयनगर) यांना आज पहिली अपॉइंटमेंट मिळाली होती. त्यांच्यासह त्यांच्या दोन बहिणी अश्विनी आणि स्नेहा तसेच आई वंदना बाबुराव कांबळे आणि अनुज अरुण टाकळकर (रा. उस्मानपुरा) या ५ व्यक्ती पासपोर्ट कार्यालयात हजर होत्या. एकावेळी एकाच व्यक्तीची थर्मल गनद्वारे तपासणी करून, मास्क असेल तरच प्रवेश दिला जात होता. बाहेर प्रतीक्षेत असलेल्या इतर व्यक्तींना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून एका बाकावर एकाच व्यक्तीला बसविण्यात आले होते. पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील संगणक कॅमेरे व इतर यंत्रसामग्रीची चाचणी घेऊन आजपासून काम सुरू केले आहे. मागील ८ महिन्यांत लोकांना पासपोर्टसाठी नाशिक आणि मुंबईला जावे लागत होते.
विभागातील १० पासपोर्ट कार्यालये सुरू
औरंगाबादसह नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना, जळगाव, लातूर, भुसावळ आणि धुळे अशी १० पासपोर्ट कार्यालये १ डिसेंबरपासून सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.