दिलासादायक! विद्यार्थ्यांच्या खात्यात थकीत ६० टक्के शिष्यवृत्ती जमा
By विजय सरवदे | Published: January 3, 2024 02:05 PM2024-01-03T14:05:08+5:302024-01-03T14:10:01+5:30
छत्रपती संभाजीनगर : सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षांपासून थकलेली शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ...
छत्रपती संभाजीनगर : सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षांपासून थकलेली शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारचा ६०, तर राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा असतो. राज्य शासनाने आपल्या हिस्स्याची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना नियमितपणे वाटप केली. मात्र, दोन वर्षांपासून या रकमेच्या वाटपासंबंधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. नुकतेच हे प्रकरण निकाली निघाले. त्यामुळे आता केंद्र सरकारने त्यांच्या हिस्स्याची ६० टक्के शिष्यवृत्ती रक्कम समाज कल्याण विभागामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील ३० हजार १०१ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली आहे.
यासंदर्भात समाज कल्याण सहायक आयुक्तांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, विद्यार्थ्यांनी प्राप्त झालेल्या या रकमेतून अनुज्ञेय निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व नापरतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयांकडे सात दिवसांच्या आत जमा करावी.