दिलासादायक! जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत जलवाहिनीची चाचणी यशस्वी

By मुजीब देवणीकर | Published: March 5, 2024 04:17 PM2024-03-05T16:17:30+5:302024-03-05T16:18:02+5:30

पाण्याच्या मागणीत वाढ होत असताना दिलासादायक वृत्त; आता फारोळा ते नक्षत्रवाडीपर्यंत महत्त्वाचा अंतिम टप्पा बाकी

Comforting! Test of water channel from Jayakwadi dam to Farola successful | दिलासादायक! जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत जलवाहिनीची चाचणी यशस्वी

दिलासादायक! जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत जलवाहिनीची चाचणी यशस्वी

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत ९०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिनीची चाचणी सोमवारी रात्री यशस्वीरीत्या पूर्ण झाली. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापासून नक्षत्रवाडी पंपगृह, नक्षत्रवाडीच्या डोंगरावरील एमबीआरपर्यंतची टेस्टिंग बाकी आहे. या सर्व प्रक्रियेला आणखी चार दिवस लागण्याची शक्यता आहे. शहराला पुढील आठवड्यापासून वाढीव २५ एमएलडी पाणी मिळू शकते. दररोज पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे.

उन्हाळ्यापूर्वी शहरात ७५ एमएलडी वाढीव पाणी शहरात येईल, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केला होता. नवीन जलवाहिनीसाठी ४ हजार अश्वशक्तीचा पंप नियोजित वेळेत आला नाही. त्यामुळे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ४०० अश्वशक्तीचे तीन पंप वापरून स्वतंत्रपणे जलवाहिनीची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत पाणी आणण्यात सोमवारी रात्री यश आले. पाणी खूपच मातीमिश्रित असल्याचे फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात घेण्यात आले नाही. मंगळवारी जलवाहिनी रिकामी केल्यास ती आपोआप स्वच्छ होईल, अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली.

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रापासून नक्षत्रवाडी पंप हाउसपर्यंत जलवाहिनीची चाचणी बाकी आहे. पंप हाउसपासून डोंगरावरील एमबीआरपर्यंतची चाचणी पुढील चार दिवसांत हाेईल, अशी अपेक्षा आहे. तपासणीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर २४ तास पंपिंग करून वाढीव २५ एमएलडी पाणी शहरात आणले जाईल. या सर्व प्रक्रियेला किमान एक आठवडाही लागू शकतो.

हायड्रोलिक टेस्टिंग अशक्य
सध्या शहरात पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे हायड्रोलिक टेस्टिंगचा मुद्दा बाजूला ठेवून जलवाहिनी सुरू केली जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले. एक किलोमीटर अंतरावर जलवाहिनीची दोन्ही तोंडे बंद करून प्रेशर वाढविले जाते. याला हायड्रोलिक टेस्टिंग म्हणतात. ४० किमी जलवाहिनीच्या चाचणीला बरेच दिवस लागू शकतात.

मोठा पंप आल्यास....
४ हजार अश्वशक्तीचा मोठा पंप आल्यास २४ तासांत किमान ७५ एमएलडी पाण्याचा उपसा करणे मनपाला शक्य होईल. या अतिरिक्त पाण्यामुळे शहराला किमान दोन ते तीन दिवसांआड पाणी मिळणे शक्य होईल. २० फेब्रुवारीपासून वाढीव पाणी येईल, असा दावा करण्यात आला होता. ५ मार्च आला तरी अद्याप ‘टेस्टिंग’चे प्रयोग सुरू आहेत.

Web Title: Comforting! Test of water channel from Jayakwadi dam to Farola successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.