महापालिका निवडणुका येताच आला मोसम मतदारांच्या स्थलांतराचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 02:22 PM2020-01-07T14:22:27+5:302020-01-07T14:25:48+5:30
काही वॉर्ड आरक्षित होण्याचा विचार करून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुका येताच मतदार स्थलांतरित करण्याचा मोसम सुरू झाला आहे. एखादे नैसर्गिक संकट आल्याप्रमाणे मतदार एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात स्थलांतरित करण्यासाठी फॉर्म नं. ८ चे गठ्ठेच्या गठ्ठे बीएलओंना (बुथ लेव्हल आॅफिसर) हाताशी धरून पुरवणी यादीत घुसविण्याचे प्रकार काही वॉर्डांमध्ये होतील, असा संशय व्यक्त होत आहे. तर काही वॉर्ड आरक्षित होण्याचा विचार करून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सोशल मीडियामध्ये उतरत्या क्रमानुसार ११५ पैकी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित होणाऱ्या वॉर्डांची यादी सध्या फिरते आहे. त्या यादीला कोणताही आधार नसला तरी मनपा हद्दीतील आरक्षित वॉर्डांमध्ये दुसऱ्या वॉर्डांतील ओळखीचे मतदार स्थलांतरित करायचे. जेणेकरून निवडणुकीत त्या मतदारांचे १०० टक्के मतदान पदरात पाडून घ्यायचे आणि विजयी व्हायचे. असे गणित करून मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या आहेत. शिवसेनेनेदेखील याबाबत तक्रार केली होती.
२०१५ सालच्या निवडणुकीत काय घडले होते
२०१५ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत पश्चिम आणि पूर्व मतदारसंघातील आरक्षित असलेल्या वॉर्डांमध्ये ८०० हून अधिक मतदार स्थलांतरित करण्यात आले होते. त्या मतदारांचे पूर्ण मतदान स्थलांतर करून घेणाऱ्या उमेदवाराच्या पारड्यात गेले होते. यामुळे अनेक पक्षांचे उमेदवार पराभूत झाले होते. या निवडणुकीतही तसाच प्रकार होण्याची चर्चा सुरू आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांचे मत असे....
निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी सांगितले, बीएलओंची बैठक येत्या आठवड्यात घेण्यात येईल. मतदार स्थलांतराचे अर्ज स्क्रूटणी करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पाच पन्नास मतदारांचे स्थलांतर होत असेल तर ठीक आहे; परंतु शेकड्यांनी स्थलांतर होत असेल तर याबाबत पारदर्शकता आणावी लागेल. नवमतदार नोंदणी ही नियमित प्रक्रिया आहे. निवडणुकीपुरता मतदार नोंदणी कार्यक्रम नसतो.