आगामी काळात महाराष्ट्रातील औद्यौगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 06:17 PM2018-03-21T18:17:39+5:302018-03-21T18:19:08+5:30
जर्मनीतील १ हजारांहून अधिक कंपन्या भारतात जॉइंट व्हेंचर करारांतर्गत कार्यरत आहेत. त्यामुळे देशातील गुंतवणूक वाढत आहे. या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ८०० कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आहे.
औरंगाबाद : जर्मनीतील १ हजारांहून अधिक कंपन्या भारतात जॉइंट व्हेंचर करारांतर्गत कार्यरत आहेत. त्यामुळे देशातील गुंतवणूक वाढत आहे. या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ८०० कंपन्यांची गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. त्यातील काही गुंतवणूक औरंगाबादमध्ये आहे. गुंतवणुकीसाठी भारताचे राजदूत, राज्यातील उद्योग विभाग, सचिव आणि उद्योजकांच्या प्रयत्नांनीच शहरातील पर्यायाने महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढेल, असा दावा जर्मन कौन्सिलेटचे राजदूत डॉ. युरगन मोरहार्ड यांनी पत्रकार परिषदेत केला.
नासकॉम, सीएमआयए आणि ईसी-मोबिलिटीतर्फे आयोजित स्मार्ट मोबिलिटी कॉन्फरन्ससाठी ते शहरात आले होते. कॉन्फरन्सनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील इको बिझनेस सिस्टिमचे कौतुक केले. नॉलेज इन्व्हेस्टमेंट बेस या तत्त्वावर ईसी-मोबिलिटी कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. यातून रोजगार व गुंतवणुकीला चालना मिळणार असल्याचे सांगून मोरहार्ड म्हणाले की, महाराष्ट्रासह तामिळनाडू, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांतही गुंतवणूक केली जाईल. ई-मोबिलिटी आणि ई-व्हेईकल यासंदर्भात शहरातील कंपन्या विशषेत: ई-सी मोबिलिटी या कंपनीशी करार झाला असून, गुंतवणुकीसोबत नॉलेज इन्व्हेस्टमेंटवरही अधिक भर देण्यात येणार आहे. यासाठी एआरएआय या पुणेस्थित कंपनीशीही करार झाला आहे.
भविष्यात आम्ही अत्याधुनिक ई-व्हेईकल करणार आहोत आणि त्यात भारतीय तंत्रज्ञान वापरणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी सीएमआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, एम.आर. सराफ यांची उपस्थिती होती.
शहराविषयी तक्रार नाही
दोन वर्षांपासून कौन्सिलेट जनरल म्हणून जर्मनीचे काम करीत आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा या राज्यांतील मुख्य शहरात मी गुंतवणुकीच्या अनुषंगाने फिरलोय, आजपर्यंत औरंगाबाद शहराविषयी साध्या एका ओळीची तक्रारही आली नसल्याचे गौरवोद्गार डॉ. मोरहार्ड यांनी यावेळी काढले.
जर्मनी राष्ट्राध्यक्ष भारत दौर्यावर
लवकरच जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष भारत दौरा करणार आहेत. भारताची प्रगती, गेल्या चार वर्षांतील बदल, औद्योगिक भरभराट याचे ते बारकाईने अवलोकन करणार आहेत. याचा आढावा जर्मन मीडियाही घेणार आहे.प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया राष्ट्राध्यक्षांच्या दौर्यादरम्यान ‘इंडिया रायझिंग’चे जर्मनीत मार्केटिंग करणार आहेत, असे मोरहार्ड यांनी सांगितले.