औरंगाबादमधील कचराकोंडीला आयुक्तच जबाबदार; महापौरांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 02:49 PM2018-03-10T14:49:55+5:302018-03-10T15:22:11+5:30
शहरातील कचराकोंडीला फक्त आणि फक्त महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर एकमेव जबाबदार असून, मागील पाच महिन्यांमध्ये त्यांनी कागदी घोडे नाचविण्यातच वेळ वाया घालविला. एकही ठोस निर्णय घेण्यास आयुक्त तयार नाहीत, असा जोरदार प्रहार महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.
औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला फक्त आणि फक्त महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर एकमेव जबाबदार असून, मागील पाच महिन्यांमध्ये त्यांनी कागदी घोडे नाचविण्यातच वेळ वाया घालविला. एकही ठोस निर्णय घेण्यास आयुक्त तयार नाहीत, असा जोरदार प्रहार महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर केला. कचराकोंडीमुळे उद्या शहरात काही झाल्यास मी जबाबदार राहणार नाही, असे विधान मनपा आयुक्तांनी केले. म्हैसकर यांनी मनपा आयुक्तांना ठणकावत सांगितले की, जबाबदारीपासून असे अजिबात पळता येणार नाही. आयुक्त म्हणून सर्वस्वी जबाबदारी तुमचीच आहे.
नारेगावच्या आंदोलकांनी मनपाला चार महिन्यांचा वेळ दिला. या चार महिन्यांत प्रशासन म्हणून आयुक्तांनी ठोस निर्णय घेतला नाही. १६ फेब्रुवारीपासून नारेगावच्या आंदोलकांनी कोंडी केली. २२ दिवसांपासून शहरात हजारो टन कचरा रस्त्यावर पडून आहे. प्रशासन म्हणून काय पाऊल उचलले हे जरा आयुक्तांना विचारा, अशा शब्दांत महापौरांनी आघात केला. आणीबाणी कायद्याचा वापर करून कचर्यावर प्रक्रिया करणार्या छोट्या मशीन खरेदी करा म्हटले तरी आयुक्त ऐकत नाहीत. लोकप्रतिनिधींच्या आदेशाचे आयुक्तांना पालन करायचे नसेल तर मी बैठक सोडून जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगताच प्रकरण गंभीर वळणार आले. ‘स्थायी’चे सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांनीही स्मार्ट सिटीच्या निधीतून ई-रिक्षा, डस्टबीन खरेदीसही आयुक्त तयार नसल्याचे सांगितले.
मुगळीकर यांनी म्हैसकर यांच्यासमोर आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा वाचून दाखविताना कचर्यामुळे उद्या शहरात काही झाल्यास माझी जबाबदारी राहणा र नाही, असे सांगून टाकले. त्यांच्या या विधानावर म्हैसकर यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. असे विधान करणे चुकीचे आहे. शेवटी आयुक्त म्हणून ही सर्व जबाबदारी तुमचीच आहे. जबाबदारीतून असे पळता येत नाही, असा सल्ला त्यांनी दिला.