औरंगाबादचा लिंगायत महामोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:46 PM2018-03-23T19:46:15+5:302018-03-23T19:50:07+5:30
औरंगाबादेत मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबादेतमराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा एकजूट होऊन यशस्वी करण्याचा निर्धार गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला. हा मोर्चा शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत चर्चा करण्यात आली.
प. पू. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज, अहमदपूरकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये ८ एप्रिल रोजी निघणाऱ्या लिंगायत धर्म महामोर्चाच्या विचार विनमयासाठी गुरुवारी (दि.२२) विश्वरूप हाॅल, ज्योती नगर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, जगन्नाथअप्पा वाडकर, नगरसेवक सचिन खैरे, शिल्पाराणी वाडकर, विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक भरत लकडे, वीरभद्र गादगे, महाराष्ट्र वीरशैव सभा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, सचिन संगशेट्टी, शिवा खांडखुळे, आशिष लकडे, शिवानंद मोधे, सोमेशअप्पा लिंभारे, कैलास पाटील, प्रिती गूळवे- पाटील, सुरेश वाळेकर, हुरणेअप्पा, चंपा झुंझारकर, मीना पिसोळे, भगवान तीळकरी, विलास लंबे, अनिल पाडळकर, कैलास झारेकर, संतोष वडाळे, सोमनाथ मिटकरी आणि डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, उद्योजक, व्यापारी, कर्मचारी, राजकीय, सामाजिक, विद्यार्थी,युवक, सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काकासाहेब कोयटे म्हणाले, समाजाची मागणी पूर्ण करण्याचे आश्वाशन देणाऱ्या राजकीय पदाधिकारी सत्ता आल्यानंतर आता नकार देत आहे. इतर समाज ताकदीने उभे रहात आहे. त्यामुळे लिंगायत समाजानेही मागे राहता कामा नये. महामोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी सकाळी १० वा. क्रांतीचौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चाच्या नियोजनासाठीची व्यापक बैठका घेणे, त्यासह लिंगायत समाजातील विविध सर्व पोटजातींतील बांधव-भगिनींना मोठ्या संख्येने सहभागी करण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. महामोर्चासाठी जनजागृती सुरू आहे. त्याची व्यापकता आता वाढत आहे.