स्वखुशीने करतोय आत्महत्या, कुटुंबाला त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:02 AM2021-03-21T04:02:17+5:302021-03-21T04:02:17+5:30
भराडी : ‘स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी’ अशी चिठ्ठी लिहून भराडी येथील ...
भराडी : ‘स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी’ अशी चिठ्ठी लिहून भराडी येथील भुसार व्यापारी काकासाहेब भिका भागवत (४८) यांनी आपले आयुष्य संपवले. डोईफोडा शिवारातील गट क्रमांक ६१मधील एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या हृद्यद्रावक घटनेने भराडी गावात शोककळा पसरली आहे. काकासाहेब यांच्यावर बॅंकेचे कर्ज असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे जवळच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.
काकासाहेब भिका भागवत यांचा भराडी येथे भुसाराचा व्यवसाय आहे. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दुकानातून घरी आले. कुटुंबियांसोबत जेवण झाल्यानंतर ते रात्री झोपले. सकाळी घरातील सर्वजण उठल्यानंतर काकासाहेब घरात नसल्याचे दिसले. त्यामुळे मुलगा रोहितने दुकान, गोदामावर जाऊन शोध घेतला, तिथेही ते न आढळल्याने रोहितने शेतात जाऊन पाहिले असता, लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला वडील दिसले. रोहितने काका पंढरी भागवत यांना ही घटना सांगितली. पोलीस पाटलांसह गावातील लोकांनी घटनास्थळी येत पोलीस पाटलांच्या समक्ष काकासाहेब यांना सिल्लोड उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सिल्लोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जाधव, संदीप कोथलकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जवळील नातेवाईकांची चौकशी बाकी आहे. सिल्लोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी साडेबारा वाजता काकासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास बीट जमादार जाधव, संदीप कोथलकर करत आहेत.
खिशात सापडली चिठ्ठी
पोलिसांनी सांगितले की, काकासाहेब भागवत यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात काकासाहेब यांनी म्हटले आहे की, ‘मी स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलीस सरंक्षण देतील’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
खासगी बॅंकेचे कर्ज असल्याची चर्चा
काकासाहेब यांच्यावर खासगी बॅंकेबरोबरच पतसंस्थेचे कर्ज असल्याचे काही नातेवाईकांनी सांगितले. शेतीबरोबरच भुसार मालाचे व्यापारी म्हणून त्यांची गावात ओळख होती. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळूनच काकासाहेब भागवत यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्यांच्या नातेवाईकांकडून म्हटले जात आहे.