सर्वसामान्यांना आपला वाटणारा लोकप्रतिनिधी हवा; तरुणाईने मांडली स्पष्ट, परखड मते
By मुजीब देवणीकर | Published: May 9, 2024 01:13 PM2024-05-09T13:13:33+5:302024-05-09T14:00:53+5:30
चाय पे चर्चा: शहराचा पारा जसा चाळीशी पार जात आहे, तसे निवडणुकीचे वातावरणही हळूहळू तापू लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर : बेरोजगारीने तरुण बेजार झालेत. औद्योगिक वसाहतींमध्येही नोकऱ्या नाहीत. तरुणांचे वय वाढत चालले आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा, सुख-दु:खात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी हवा. निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांपैकी अनुभवी, सर्वधर्म समभाव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचे मत तरुणाईने मिसारवाडी येथे ‘चाय पे चर्चा’वर व्यक्त केले.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली. शहराचा पारा जसा चाळीशी पार जात आहे, तसे निवडणुकीचे वातावरणही हळूहळू तापू लागले आहे. सर्वसामान्यांमध्येही कोण पुढे, कोणाच्या जमेच्या बाजू जास्त, यावर ठिकठिकाणी चर्चा रंगली आहे. रविवारी मिसारवाडी भागातील एका चहाच्या दुकानाच्या बाजूला तरुणाईचीही चर्चा चांगलीच रंगली होती. चर्चेत सहभागी काहींना महाविकास आघाडी भक्कम असल्याचे वाटते. काहींना एमआयएम, शिंदेसेना, वंचितच्या उमेदवारावर सर्व गणित अवलंबून असल्याचे वाटते.
काय म्हणाले तरुण:
प्रचारात रंगत येण्यासाठी अजून दोन आठवडे जरी वेळ असला, तरी महाविकास आघाडी सध्या तरी भक्कम वाटत आहे. मतदानापूर्वी चित्र आणखी स्पष्ट होईल.
- अभिजीत हिवाळे
कोणता उमेदवार किती पुढे जाईल, कोणत्या समाजाची त्याला किती मते मिळतील हे पुढील काही दिवसांत लक्षात आल्यावर गणित अधिक प्रभावीपणे मांडता येईल.
- रवी पंडित
मराठा समाजासह भाजपाची मते ज्याला पडतील तो उमेदवार निवडून येईल, असे सध्या मला वाटते. मतदारांना संबंधित उमेदवार कसे प्रभावित करतात ते बघू.
- किरण कळसकर
राजकीय अनुभव दांडगा असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचा विचार सुरू आहे. त्यांच्याकडून आमच्यासारख्या तरुणाईला बऱ्याच अपेक्षा आहेत.
- स्वप्नील गिऱ्हे
कालपर्यंत मतदारांना गृहित धरणाऱ्यांचे डोळे उघडले आहेत. भविष्यात ते चुका करणार नाहीत, असे वाटते. त्यामुळे त्यांना निवडून देण्याचा विचार आहे.
- अनिकेत जोगदंड
निवडणूक रिंगणात असलेल्या एका तरुण, सुशिक्षित आणि लोकसभेत सर्वसामान्यांचे दु:ख मांडणाऱ्या उमेदवाराला मत देण्याचा निर्णय घेतला आहे.
- शेख शाहरूख
सर्वसामान्यांचे खासदारांकडे कोणतेही काम नसते. मात्र, त्यांनी जिल्ह्यासाठी बरेच काही करावे. सर्वाधिक सुशिक्षिताला प्राधान्य देणार आहे.
- परवेज कुरैशी